

अलिबाग : रायगड पोलीस विभागाच्या हद्दीत गेल्या 14 महिन्यांमध्ये आकस्मिक मृत्यूच्या 1298 घटना घडल्या आहेत. आत्महत्यासारख्या घटना या आकस्मिक मृत्यूमध्ये येतात. तसेच पाण्यात बुडून, सरपटणारे प्राणी चावून मृत्यू असल्यास आकस्मित मृत्यू म्हणून नोंद होते.
मरण हे कुणालाच चुकलेले नाही. जन्माला येणारा व्यक्ती प्राणी एक ना एक दिवस जग सोडून जातो. मात्र देवाने दिलेला मनुष्याचा जन्म हा आनंदाने जगायचे सोडून काहीजण अर्धवट जीवनात स्वतः हून जीव देऊन मृत्यूला कवटाळतात. जिल्ह्यात 2025 वर्षभरात 1133 तर जानेवारी 2026 मध्ये 76 आणि फेब्रुवारी 26 मधे 89 असे एकूण 1298 जणांचा अकस्मात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
सरपटणारे प्राण्याचा दंश होऊन, तळ्यात, विहिरीत, धरणात पोहायला जाऊन बुडून काहीजण मृत्यू पावतात. काहीजण विजेचा शॉक लागून किंवा वीज अंगावर पडून मृत्यू पावतात. मात्र काहीजण जीवनाला कंटाळून गळफास, विष प्राशन करून आपले जीवन संपवितात. जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण ही वाढले आहे.
रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत अकस्मात मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. 2025 वर्षात 1133 तर जानेवारी 2026 महिन्यात 76 तर फेब्रुवारी 26 मधे 89 अकस्मात मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. काही प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद झालेली असली तरी पोलिस तपासात हत्या, खुनाचा संशय ही बळावत असतो.
पाण्यात बुडून, विजेचा शॉक लागून, सरपटणारे प्राण्याचा दंश करून मृत्यू झालेल्या घटना कमी असल्या तरी आत्महत्या केल्याच्या घटना अधिक आहेत. कर्जबाजारी, प्रेम प्रकरण, मानसिक आजार, अभ्यासाचा टेंशन अशा विविध कारणाने अडकलेले हे आत्महत्येचे पाऊल उचलून आपले जीवन संपवत असतात. आत्महत्या करणे, तलावात, नदीत, धरणात बुडणे, सर्पदंश, शॉक लागणे, वीज कोसळणे ही आकस्मिक मृत्यूची कारणे आहेत.
मृत्यूची कारणे
जीवनाला कंटाळलेला, प्रेम भंग, आर्थिक अडचणीत सापडलेला व्यक्ती हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. आत्महत्या करण्यापासून रोखणे हे खरे आव्हान आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेल्या व्यक्तीला आधारची गरज असते. ती मिळाली तर आत्महत्या रोखणे शक्य होणार आहे.