Palghar water crisis: वाड्यातील पिजांळ नदीकिनारच्या गावाचा पाण्यासाठी संघर्ष

उमरोठे गावकऱ्यांना पाण्याची वर्षभर धास्ती
Palghar water crisis
कोरडी पडत चाललेली बोअरवेल, केवळ दिखाव्यासाठी उभे असणारे हे जलकुंभ pudhari photo
Published on
Updated on

वाडा : मच्छिंद्र आगिवले

चार नद्यांचा शेजार लाभलेला असूनही केवळ नियोजनाचा अभाव असल्याने जानेवारीपासून जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. वाडा शहरापासून हाकेच्या अंतरावर व पिंजाळ नदीच्या तीरावर वसलेल्या उमरोठे गावची पाण्यासाठी सुरू असणारी तारांबळ याचेच द्योतक आहे.

साधारण 400 लोकवस्ती असणाऱ्या या गावात सामान्य जनतेला पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असून दोन जलकुंभ व अनेक कोरड्या बोअरवेल केवळ देखाव्यासाठी आहेत असे लोकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने तातडीने या गावात पाण्याची सोय करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा महिलांनी दिला आहे.

Palghar water crisis
पिंपरी-चिंवचड पाण्याचा प्रश्न मिटणार: दहा दिवसांत मिळणार 100 एमएलडी अतिरिक्त पाणी; प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

वाडा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर व तालुक्यातील सर्वात मोठा जलस्त्रोत असणाऱ्या पिंजाळ नदीच्या तीरावर वसलेल्या उमरोठे गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष सुरू आहे. मुख्य गावासह केवळ नावाने असणाऱ्या “ नदीचापाडा “ भागात पाण्यासाठी मात्र वणवण सुरू असून जवळपास 250 च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या या आदिवासी लोकवस्तीच्या पाड्यात पाण्यासाठी रोजच युद्ध सुरू असते. एकमेव बोअरवेलचे पाणी आटल्याने लोकांना टोकाचा संघर्ष करावा लागत असून पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत लोकांना पाण्यासाठी रांगा लावाव्या लागतात असे स्थानिक सांगतात.

पाण्याअभावी गावात असणाऱ्या वीट भट्ट्यांवर लोकं जाणीवपूर्वक कामाला जातात व पावसाळा येईपर्यंत तिथेच झोपडी बांधून राहतात असे स्थानिक सांगतात. वर्षानुवर्षे पाण्यासाठी होणारी ही फरपट संतापजनक असून सरकार पाण्याची ही समस्या सोडविण्यात अपयशी ठरत असल्याने लोकांचा जीव पाण्यावाचून मेटाकुटीला आला आहे.

उमरोठे गावात जलजीवन मिशन अंतर्गत योजना मंजूर असून तिचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे मात्र लोकांच्या नशिबी फरपट कायम असल्याने हरघर जल मिळणार कधी असा प्रश्न लोकांना पडला आहे. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभाग गावात बोअरवेल मारून देण्याचा प्रस्ताव आहे असे सांगत असले तरी 200 फुटांची मर्यादा असणाऱ्या या सरकारी बोअरवेल कुचकामी ठरतात व ही निधीची केवळ नासाडी आहे असे लोकांचे म्हणणे आहे.

Palghar water crisis
Palghar PWD department : जव्हार सा.बां.विभागाचा पदभार झेडपीच्या कार्यकारी अभियंत्याकडे

विद्यार्थ्यांचा पाण्यासाठी टाहो

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहासह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी असे निर्देश आहेत. उमरोठे गावातील जिल्हा परिषद शाळेत मात्र पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचाही घशाला कोरड पडते. पहिले ते पाचवीच्या विद्यार्थांसाठी पाण्या अभावी स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे शक्य होत नसून ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती विभाग झोपा काढते का असा सवाल विचारला जात आहे.

सरपंच व अन्य कमिटी सोबत चर्चा करून उमरोठे गावातील पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा याबाबत निर्णय घेतला जाईल. बोअरवेल खोदण्याचा प्रस्ताव असून जलजीवन योजना सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. टँकरसाठी प्रस्ताव पाठविला जाईल.

दिक्षा पाटील, ग्रामसेविका, ग्रामपंचायत देवळी - उमरोठे

जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेली योजना थेट या पाड्यात वळविता येईल अशी गटविकास अधिकारी यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. तशा कंत्राटदाराला सूचना करण्यात आल्या आहेत ,मात्र वाहिन्यांची जोडणी केल्यास लोकं वाहिन्या तोडतील अशी कंत्राटदाराला भीती आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.

अभिनव थोरात, पा. पु. कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती, वाडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news