

बोईसर : संदीप जाधव
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या गारगाव–ऐना रस्त्याची गुणवत्ता पहिल्याच पावसात उघडी पडली आहे. सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरील डांबर महिन्याभरातच वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाचा निधी अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बांधकामादरम्यान आवश्यक दर्जाची पायाभरणी न करता थेट मुरूम व मातीवर डांबराचा थर टाकण्यात आला. त्यामुळे पहिल्याच पावसात डांबर उखडून वाहून गेले आणि संपूर्ण कामाच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले. नागरिकांनी यापूर्वीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी केल्याचा दावा केला जात असला, तरी संबंधित कंत्राटदाराची पाठराखण करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी केला आहे.
सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या कामाची पाहणी आणि गुणवत्ता तपासणी करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके काय करत होते? निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना ते प्रत्यक्ष पाहणीसाठी गेले होते का? की सर्व काही कागदोपत्रीच मंजूर करण्यात आले? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
पालघर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बसून अधिकारी टक्केवारीच्या व्यवहारात गुंतले असून त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
‘एका संतप्त प्रवाशाने प्रतिक्रिया देताना म्हटले, ‘लोकांच्या कराच्या पैशातून उभारलेले रस्ते महिन्याभरात वाहून जात असतील, तर अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदारीचे आत्मपरीक्षण करावे.’ दरम्यान, या निकृष्ट कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच शासनाच्या निधीची वसुली संबंधितांकडून करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.