Shevgaon Jal Jeevan Mission: शेवगाव तालुक्यात जलजीवन मिशनचा बोजवारा; अपूर्ण कामे व गैरव्यवहाराचे आरोप

कोट्यवधींचा खर्च होऊनही गावोगावी पाणीटंचाई कायम; निकृष्ट दर्जा व संथ कामांमुळे ग्रामस्थांचा संताप
Shevgaon Jal Jeevan Mission
Shevgaon Jal Jeevan MissionPudhari
Published on
Updated on

बाळासाहेब खेडकर

बोधेगाव: अपूर्ण कामे, संथ गती, निकृष्ट दर्जा आणि गैरव्यवहाराच्या चर्चांमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा शेवगाव तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा उद्देश असलेल्या या योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. अनेक गावांमध्ये मोठ्या गाजावाजात कामांना सुरुवात झाली; मात्र प्रत्यक्षात आजही तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.

Shevgaon Jal Jeevan Mission
Belapur Dam Water Dispute: बेलापूर धरण परिसरात पाणी वाद चिघळला; बदगी गावची जलजीवन योजना रखडली

तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 37 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार 12 योजनांनी 100 टक्के भौतिक प्रगती गाठल्याचा दावा केला जात आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी केवळ 6 योजना ग्रामपंचायतींकडे देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. उर्वरित 6 योजनांमध्ये अजूनही ‌‘ट्रायल अँड रन‌’ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे उर्वरित 25 योजना अजूनही विविध टप्प्यांमध्ये रखडलेल्या अवस्थेत आहेत.

Shevgaon Jal Jeevan Mission
Ahilyanagar Firing Case: अहिल्यानगर पाईपलाईन रोड हल्ला व गोळीबार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

उन्हाळ्याच्या झळांनी तालुक्यात पाणीटंचाई गंभीर झाली असताना अनेक गावांतील महिलांना अजूनही हंडाभर पाण्यासाठी मैलोन्‌‍मैल भटकंती करावी लागत आहे. जलजीवन मिशनमुळे घराघरांत नळाद्वारे पाणी येईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये जलवाहिनी टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी जलकुंभांची कामे रखडली आहेत, तर अनेक गावांमध्ये रस्ते खोदून तसेच सोडल्याने नागरिकांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, कामे अत्यंत हलगर्जीपणे करण्यात आली आहेत. काही गावांमध्ये जलवाहिनी अत्यंत कमी खोलीत टाकण्यात आल्याने भविष्यात गळती आणि पाईप फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून प्रभावी देखरेख होत नसल्याने ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने कामे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Shevgaon Jal Jeevan Mission
Ahilyanagar Spa Raid: अहिल्यानगरमध्ये स्पा सेंटरवर छापा; देहविक्री रॅकेट उघड, चार महिलांची सुटका

तालुक्यातील काही गावांमध्ये सरपंच किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संबंधित व्यक्तींनाच ठेके देण्यात आल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संपूर्ण कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. पुरेशा निधीअभावी काही कामे रखडल्याचेही बोलले जात आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन अपूर्ण कामे मार्गी लावावीत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Shevgaon Jal Jeevan Mission
Ahilyanagar BJP Candidate: अहिल्यानगरमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय हालचाली; प्राजक्त तनपुरे यांना संकेत

ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित योजना

वडुले खुर्द, वाघोली, सुळे पिंपळगाव, चेडे चांदगाव, मुर्मी, शेकटे बुद्रुक. 76 ते 99 टक्के प्रगतीतील योजना : दहिगाव ने., मुंगी, अधोडी, भायगाव, दिवटे, गोळेगाव, हातगाव, जोहरापूर, कांबी, कहेटकळी, खामपिंपरी नवी, खामपिंपरी जुनी, खानापूर, बाडगव्हाण, लाडजळगाव, नागलवाडी, पिंगेवाडी, प्रभू वडगाव, रांजणी, शेकटे खुर्द, सुकळी, राक्षी, निंबे.

100 टक्के भौतिक प्रगती झालेल्या योजना

खडके, मडके, कोनोशी, मळेगाव शे., सोनविहीर, गायकवाड जळगाव, वडुले खुर्द, वाघोली, सुळे पिंपळगाव, चेडे चांदगाव, मुर्मी, शेकटे बुद्रुक.

सरकारचा पुन्हा टँकरसाठी खर्च

लाडजळगाव येथे योजना मंजूर होऊनही असंख्य कामे झाली. मात्र, पुरेशा निधीअभावी काम रखडले आहे. सध्या पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. शासनाचा योजनेवर खर्च होऊनही पुन्हा टँकरसाठी खर्च करावा लागणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news