

बोईसर : अणुऊर्जा प्रकल्पालगत असलेल्या पथराळी ग्रामपंचायत हद्दीत गायरान व शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षितेतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण निष्काषित करण्यासाठी महसूल विभागामार्फत नोटीस देण्यात आल्या असतानाही अतिक्रमणधारकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता रस्त्यालगतच्या मोकळ्या जागाही बळकावल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पाच्या लगतच ही अतिक्रमणे वाढत असल्याने भविष्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे कठीण होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दांडी, उच्छेळी व उनभाट गावांना जोडणारा पाचमार्गी पोहोच रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद होत असून, आपत्कालीन सेवांच्या हालचालींवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तसेच सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत पात्र व बेघर लाभार्थ्यांना घरे मिळावीत, यासाठी शासनाने शासकीय व गायरान जमिनीवरील काही अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या सवलतींचा गैरफायदा घेत धनाढ्य व प्रभावशाली लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे केल्याचे आता स्पष्ट होत आहे.
२०२२ मध्ये उच्च न्यायालयात सुमोटो जनहित याचिका दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ५० नुसार अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वर्षाअखेरीस सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रभावशाली अतिक्रमणधारकांवर ठोस कारवाई न झाल्याने परिस्थिती पुन्हा पूर्ववत बिघडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पथराळी गावातील गायरान गट क्रमांक २५ मधील सुमारे ४१.६२ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, काही अतिक्रमणधारकांनी ही जमीन ढोबळी मिरची लागवडीसाठी भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेजारील पोफरण, उनभाट व उच्छेळी गावांतील काही ग्रामस्थांनीही या क्षेत्रात अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे.