

पालघर : हनिफ शेख
जिल्ह्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दरम्यान पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक असलेल्या अंड्याच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. थंडी सुरू होताच अंड्यांचे दर वाढू लागतात.
काही दिवसांपूर्वीच 170 ते 180 रुपयाला 30 अंड्याचा एक ट्रे मिळत होता तो आता काल-परवापर्यंत थेट 200 ते 210 रुपयापर्यंत पोहोचला आहे. यामुळे किरकोळ विक्रीमध्ये एक अंडे तब्बल आठ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. परिणामी सर्वसामान्य माणसांच्या खिशाला मात्र कात्री बसणार असून रोज अंडे खाताना विचार करावा लागणार आहे.
अंडी, अंड्यांचे पदार्थ हे व्यायाम करणाऱ्या तसेच अनेकांच्या रोजच्या जीवनातील अभिवाज्य घटक असल्याने याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. मात्र अंडी महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे मात्र बजेट कोलमडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. खरंतर प्रत्येकाच्या घरात बॉयलर अंडी पसंती दिली जाते.मात्र त्यातही अंड्याचा दर आठ रुपयाहून अधिक जात असल्याने अंडे विकत घेतानाही आता विचार करावा लागत आहे.
बॉयलर कोंबडी चे खाद्य मका,गहू आणि त्या पद्धतीचे काही ब्रँडचे खाद्य सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.यांचे भाव वाढल्यानंतर खरंतर अंड्याचे भाव वाढू शकतात.याशिवाय थंड वातावरणामध्ये बॉयलर कोंबडी कमी अंडे देत असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात तर दुसरीकडे थंडीमध्ये अंड्यांसाठी मोठी मागणी असल्याचे दुकानदार सांगतात.
यामुळे उत्पन्न कमी आणि मागणी जास्त या तत्त्वानुसार या अंड्यांच्या दरात वाढ झाल्याचे एकूण चित्र आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागात अंड्यांचा प्रवास हा अनेक मार्गातून जातो. म्हणजेच ज्या ठिकाणी अंडी उपलब्ध होतात त्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणावर आणणे तो प्रवास खर्च तिथून मग ग्रामीण भागातील दुकानांपर्यंत तो पोहोचविणे आणि मग त्याची विक्री करणे या सर्व प्रोसेस मध्ये देखील त्याचे भाव वाढल्याचे दिसून येते.
सध्या बाजारपेठेत अंड्यांना मोठी मागणी आहे.कारण की आज घडीला ज्या पद्धतीने गल्लीबोळात वडापाव चे गाडे आपल्याला दिसतात त्याच पद्धतीने आज सगळीकडे अंडा भुर्जी अंडा आमलेट बॉयलर अंडी याशिवाय चायनीज मध्ये हॉटेलमध्ये सुद्धा अंड्यांना मोठी मागणी आहे. यामुळे मागणीत प्रचंड वाढ असताना अंड्यांचे उत्पन्न मात्र कमी झाल्याचे देखील बोलले जात असल्याने ही महागाई वाढल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे या कोंबड्यांना खाण्यासाठी लागणारे खाद्य महाग होणे अंड्यांचा ट्रे ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी लागणाऱ्या वाहनांचे भाडे वाढणे किंवा डिझेलच्या किमतीत वाढ होणे. अशा सर्व महागाईचा फटका देखील या अंड्याच्या दरावर होऊ शकण्याचा अंदाज यातील तज्ञ व्यक्त करत आहेत.
अंड्याच्या दरात वाढ झाली आहे.या आधी 180 ते 190 रुपयांना 30 अंड्याचा ट्रे आम्ही होलसेल दरात देत होतो. मात्र अगदी काल परवा हाच ट्रे 200/210 रुपया पर्यंत गेला आहे. आम्हाला सुद्धा प्रवास खर्च काढणे मुश्कील जाते यामुळे अंडी महाग झाल्यास त्याच्या विक्रीवर सुद्धा फरक जाणवतो. याचा दर कमी होईल की नाही याबाबत त्यातील जाणकारच अधिक माहिती देऊ शकतील
तौफिक तांबोळी, ताज अँगज सेंटर,मोखाडा.