

मुंबई : मुंबईतील ताज लँड हॉटेलातील शिवसेनेच्या (उबाठा) भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघटनेत सहभागी होण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून दबाव येत असल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हॉटेलला धडक दिली. या आंदोलनामुळे येथील वातावरण चांगलेच चिघळलेे. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य वाद टळला.
वांद्रे येथील या पंचतारांकित हॉटेलमध्ये आधीपासून शिवसेनेची भारतीय कामगार सेना संघटना कार्यरत आहे. त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी भाजपप्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचीही स्थापना करण्यात आली. भाजपच्या या संघटनेत ठाकरे गटाच्या कामगारांची दिशाभूल करून त्यांच्या सह्या घेऊन संघटनेत सहभागी होण्याबाबत हॉटेल प्रशासनाकडून दबाव येत होता. त्याविरोधात शुक्रवारी शिवसेना नेते, आ. अनिल परब यांच्या नेतृत्वात शिवसेनेने हॉटेलबाहेर आंदोलन केले.
व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी अनिल परब तेथे गेले असता पोलिसांनी त्यांना अटकाव केला. पोलिसांनी हॉटेलचे मुख्यद्वार बंद केले. त्यावेळी परब यांनी पोलिसांना धारेवर धरले. परब यांनी पोलिसांना गेट खोलण्यास सांगितले. मात्र पोलिसांनी चार ते पाच जणांना घेऊन आत जा असे सांगितले. परंतु, परब यांनी माझ्यासोबत किमान 25 जणांना मी आत घेऊन जाणार, असे पोलिसांना ठणकावून सांगितले.
परब यांचा संताप
यावेळी सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का, असे म्हणत परब यांनी संताप व्यक्त केला. कामगारांना जी युनियन पाहिजे तीच राहिल, पण आमच्या युनियनला येथून जोरजबरदस्तीने बाहेर काढता येणार नाही. हॉटेलचा धंदा बसला तरी चालेल. वेळ पडल्यास आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशाराही परब यांनी दिला.