

अलिबाग : राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अलिबाग नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना(शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) या पक्षांनी एकत्र येत महायुतीची घोषणा केली आहे. या युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी तनुजाताई पेरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या नावाची घोषणा खुद्द दक्षिण रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी समारंभात केली.
घोषणा झाल्यानंतर, सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने भाजपचे नगर परिषद प्रचार प्रभारी सतीश धारप यांच्या हस्ते तनुजा पेरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि उमेदवारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, शोभा जोशी, आणि इतर सहयोगी पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांनी एकमताने या निर्णयाचे स्वागत केले. महायुतीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीला आता नवी दिशा मिळाली असून, ही युती विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलिबागसाठी सुवर्णक्षण
खासदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी यांच्यासोबत मिळून विकासाला सामोरे जाण्यासाठी आज आपण तनुजाताई पेरेकर यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित करत आहोत. अलिबाग नगरपालिकेच्या इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण असल्याचे नमूद केले.