

खानिवडे ः घरादारात, व्यापार उदिमात , कारखान्यात श्री लक्ष्मीचा सदैव निवास राहावा, खळ्यात , कणग्यात धान्याची बरसात व्हावी म्हणून दरसाल दीपोत्सवात लक्ष्मी पूजन करणे हे खूप मोठे महत्व समजले जाते .या लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीला बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या .त्यात पूजेसाठी लागणाऱ्या फुलांचा मोठा बाजार रस्तोरस्ती फुलला होता. यात झेंडू फुल सर्वात जास्त उठून दिसत होता. दरम्यान फुल खरेदीसोबत तयार आकर्षक विविध रंगी तोरण खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
झेंडूचे हार व झेंडू फुलांची रास बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेत होती .यंदा दिवाळीत झेंडू चा दर हा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असला तरी शंभरीत आहे .यंदा आतापर्यंत सतत पाऊस बरसल्याने सर्वच फुलांच्या उत्पादनावर परिणाम आहे . याचा थेट परिणाम फुलांच्या किंमतीवर झाला आहे . झेंडूने यंदा दसऱ्यापेक्षा काहीसा कमी परंतु भावात सेंच्युरी पार केली आहे .दोन वर्षांपूर्वी दसऱ्यात झेंडूने पहिल्यांदा शंभरी पार केली होती . तर मागील वर्षी किलोला शंभर ते दिडशे रुपये मोजावे लागत होते .मात्र यंदा 70ते100 रुपयांचा भाव आहे.मात्र वसईत येणाऱ्या झेंडू फुलांमध्ये इतर जिल्ह्यातील फुलांची आवक होत आहे.
दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व असून झेंडूच्या फुलांच्या हारांना मोठी मागणी असते . शुभ मुहूर्त म्हणून नागरिक आपल्या घराच्या मुख्य दाराला , प्रत्येक वाहनाला , सागरात तरंगणाऱ्या बोटींना आणि देवळातील देवांच्या मूर्त्यांना, प्रतिमेला तसेच ग्रामीण भागात ट्रॅक्टर ,नांगर सारख्या शेती औजारांना , इतकच काय ट्रक, कार , दुचाकी या वाहनांसह सायकल ला सुद्धा हे हार मोठ्या श्रद्धेने लावले जातात . यंदा एका मोठ्या हाराला 100 ते 150 रु तर छोट्यात छोटा हार 25 ते 50 रुपयांना मिळत असून ग्रामीण भागातील महिला महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांच्या मोक्याच्या नाक्यावर विक्रीसाठी उभ्या असलेल्या दिसत होत्या .
दरवर्षी येणाऱ्या व्रत वैकल्याच्या श्रावण महिन्यात सणासुदीच्या काळात आणि मुख्यतः गणेशोत्सव , दसरा , दिवाळीच्या काळात वसईतील सुवासिक फुलांसह सर्वच फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे या फुलांची सणा सुदीच्या दिवसात लाखोंची उलाढाल होते. वसईत मोगरा, सायली , चाफा, गुलाब, तगर, कागडा , सोनचाफा व झेंडूची शेती आता मागणी वाढल्याने प्रामुख्याने करण्यात येत असून लहान मोठे असे सुमारे 4 हजार वसईकर शेतकरी बागायती व फुल शेती करीत आहेत. ग्रामीण वसई च्या काही भागा सह आगाशी, निर्मळ , कळंब या वसईतील पश्चिम पट्ट्यात सर्वात जास्त फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी आहेत.