

नेवाळी : शुभम साळुंके
दिवाळी म्हणजे उत्सव आणि नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणारा सण आहे. मात्र दिवाळीत प्रदूषणाचा डोंगर निर्माण होत असतो. दरवर्षी प्रदूषणास कारणीभूत ठरणारे फटाके आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले जात असते. बाजारात मातीच्या पणत्या तयार होऊन विक्रीसाठी उपलब्ध होत असताना मात्र त्यांना शह देण्यासाठी प्लॅस्टिकच्या पणत्या देखील बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाच्या घरी नैर्सगिक दिव्यांचा प्रकाश उजळत आहे. प्लाटिकच्या पणत्यांनी जागा नैसर्गिक पणत्यांची घेतली असली तरी जेष्ठ नागरिकांकडून नैसर्गिक पणत्यांनी दिवाळी प्रशासमय केली जात आहे.
दिवाळीत प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर निरनिराळ्या पणत्या दिसून येतात. बदलत्या काळानुसार बळीराजा देखील स्मार्ट झाला आहे. बाजारातील प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या प्लास्टिकच्या पणत्यांना खरेदी करून निर्सगाने दिलेल्या पर्यावरण पूरक पणत्यांकडे शेतकरी वर्ग पाठ फिरवत असल्याचे दिसुन येत आहे. वर्षनुवर्षापासून घरोघरी तयार होणाऱ्या चिराडांच्या पणत्या आता कालबाह्य होत चालल्या आहेत. गावाचे रूपांतर आता शहरांमध्ये झाल्याने वर्षानु वर्षांपासूनच्या पणत्या कालबाह्य होताना दिसून येत आहेत.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांची प्रकल्प उभारली असल्याने शेताच्या बांधावर येणारी चिराड आता दिसेनाशी होत चालली आहेत. दिसायला काकडी सारखा असणारा हा फळ आकाराने गोलाकार असतो. त्यामुळे त्याचे दोन भाग करून त्यामधील असलेले बीज बाजूला करून त्यामध्ये कापसाची तयार केली वात आणि तेल टाकून दीप प्रज्वलित केले जाते. विशेषता ठाणे, रायगड जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये अश्या पणत्या तयार केलेल्या जात असतात. या पणत्या बनवण्यासाठी ग्रामीण भागातून शहराकडे वळलेला नागरिक रेल्वे स्थानक परिसरात खरेदीसाठी येत असतात.
दरवर्षी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, ठाणे, दादर रेल्वे स्थानक परिसरात विक्रीसाठी हि चिराड येत असतात. ग्रामीण भागातून शहराकडे आदिवासी बांधव हे सर्वाधिक विक्रीसाठी घेऊन येत असतात. नेरळ, कर्जत आणि मलंगगड भागातून आदिवासी बांधव हे दिवाळीत हे चिराड विक्रीसाठी घेऊन येत असतात.
अभ्यंग स्नान करते वेळी काही ठिकाणी या फळातील पाणी आणि बीज डोक्याला लावले जाते. चवीने हे फळ कडू असल्याने ते डोक्यावरील केसांना लावले जात असते. मात्र दिवसेंदिवस वाढते शहरीकरण आणि पाश्चात्य देशांच्या संस्कृतीचा शिरकाव त्यामुळे निसर्गाने मोफत दिलेल्या पणतीचा आता ग्रामीण भागाला दिवसेंदिवस विसर पडत चालला आहे.