

विरार ः सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. बाजारपेठांपासून ते ऑनलाइन स्टोअर्सपर्यंत खरेदीचा हंगाम चांगलाच रंगला आहे. सोन्याचांदीची खरेदी, कपडे, मिठाई, सजावटीच्या वस्तू आणि भेटवस्तू यांची मागणी प्रचंड वाढली आहे. या सर्व गडबडीत अनेक जण ऑनलाईन शॉपिंगकडे वळत असून विविध ई-कॉमर्स संकेतस्थळांवर सवलतींचा वर्षाव सुरू आहे. “एक खरेदी करा, एक मोफत मिळवा”, “फ्री गिफ्ट”, “मर्यादित कालावधीची ऑफर” अशा जाहिरातींनी सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडवून दिला आहे.
मात्र या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचे नवे डावपेच आखले आहेत. बनावट ऑफर्स, खोट्या लिंक आणि फसव्या मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांकडून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक वेळा ‘फ्री गिफ्ट’च्या आमिषाने लोकांना आकर्षित करून त्यांची बँक माहिती, ओटीपी, पासवर्ड किंवा खात्याचे तपशील मिळवले जातात आणि क्षणार्धात त्यांचे पैसे गायब होतात.
या वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. विभागाने स्पष्ट केले आहे की, “दिवाळीचा आनंद साजरा करताना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, सोशल मीडियावरील अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, कोणालाही आपले बँक खाते तपशील, ओटीपी किंवा पासवर्ड देऊ नयेत.
”सायबर विभागाचे अधिकारी पुढे म्हणाले की, “खरेदी करण्यापूर्वी ॲप किंवा संकेतस्थळाची सत्यता तपासा. अधिकृत आणि प्रमाणित संकेतस्थळांवरूनच खरेदी करा. जर कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची माहिती मिळाली, तर त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
” दिवाळीच्या उत्सवात आनंद आणि प्रकाश पसरवताना सायबर सुरक्षेचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.नागरिकांनी सजग राहून सुरक्षितपणे व्यवहार केल्यासच सायबर चोरांचे डाव मोडीत निघतील.