

डहाणू : डहाणूच्या वाढवण किनाऱ्याजवळ अमृत-16 या टगबोटीला बुधवारी पहाटे अपघात झाला. या दुर्घटनेत सहा खलाशांपैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर एक खलाशी अजूनही बेपत्ता आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या तात्काळ मदतीमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
या घटनेत पवन विष्णू राम (29), धर्मेंद्रकुमार नंदकिशोर सिंग (43), गोविंदकुमार विदेश्वर महतो (19), सुरज विश्वकर्मा (38) आणि जदन रघुवीरसिंग पठाणीया (30) हे पाच खलाशी वाचले असून, राहुलकुमार यादव (23) हा खलाशी अजूनही बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे. मुंबई दारुखाना येथून 8 नोव्हेंबर रोजी गस्तीसाठी निघालेली अमृत-16 ही टगबोट बुधवार 12 नोव्हेंबर रोजी पहाटे वाढवण किनाऱ्यापासून सुमारे 10 नॉटिकल मैलांवर थांबलेली होती.
पहाटे दोनच्या सुमारास इंजिन रूममध्ये अचानक पाणी शिरू लागल्याचे लक्षात आल्यावर बोटीवर खळबळ उडाली. काही वेळातच बोटीत पाणी साचू लागल्याने सहा खलाशांपैकी पाच जणांनी बाहेर पडण्यात यश मिळवले, मात्र एक खलाशी पाण्यात बेपत्ता झाला.
बचावलेल्या खलाशांनी जवळच असलेल्या अन्नपूर्णा या टगबोटी कडून मदत मागितली. अन्नपूर्णा वरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत पाच जणांना सुरक्षित बोटीवर घेतले. त्यानंतर रात्री तीनच्या सुमारास एमआरसीसी मुंबईला अमृत-16 बुडल्याची माहिती मिळाली.
तात्काळ तटरक्षक दलाच्या डहाणू केंद्रातून कमांडंट जितु आय. जोस यांच्या मार्गदर्शनाखाली आयसी-117 ही बोट घटनास्थळी पाठवण्यात आली. सकाळी सात वाजता तटरक्षक दलाने पाच खलाशांना शोधून आपल्या ताब्यात घेतले आणि सकाळी नऊच्या सुमारास त्यांना सुरक्षितरित्या डहाणू किनाऱ्यावर आणले. सर्वांना त्वरित डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला तिघांची प्रकृती चिंताजनक होती, मात्र आता सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भोये यांनी दिली.
अमृत-16 या टगबोटी वरील मदतीचा संदेश मिळताच डहाणू येथील तटरक्षक दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आयसी-117 या बोटीच्या मदतीमुळे पाच खलाशांचे जीव वाचवता आले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीतही आमच्या जवानांनी सर्वांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. एक खलाशी बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
यशवंत शिवडीकर, मुख्य अधिकारी (इंटेलिजन्स), तटरक्षक केंद्र, डहाणू