

कोलाड ः विश्वास निकम
तुळशी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई खऱ्या अर्थाने सुरु होते.अनेक वधू-वर पित्यांचे पालक नातेवाईक विवाह इच्छुक वधू वरासाठी सुयोग्य जोडीदार सुरुवात करतात. रायगड जिल्ह्यातील काही तालुक्यात मात्र या विवाह इच्छुक वरांच्या पालक नातेवाईकांना वेगळाच अनुभव येत आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या विवाह इच्छुक मुलींची अपेक्षा वाढली आहे. त्यांना गावात राहणारा वर नको असल्याचे दिसून येत आहे.
कर्तव्य असलेल्या वधू, पिता, नातेवाईक,वर मुंबईत राहतो काय? स्वतःचा ब्लॉक आहे काय? पगार चांगला आहे काय? गाडी आहे काय? असे प्रश्न पहिले विचारतांना दिसत आहेत. या प्रश्नांची उत्तरे हो आली तरच पुढील बोलणी केली जात आहेत नाहीतर पुढील बोलणीचा विषय तेथेच थांबाविण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यातील काही तरुण आजही शेती, भाजीपाला उत्पादन व तत्सम रोजगार करतात.परंतु बदलत्या काळानुसार जास्त शिक्षण घेतलेल्या मुली जिवनसाथी निवडतांना शहरातील राहणारा व शहरात ब्लॉक असलेल्या जोडीदारासाठी अग्रही असल्याचे दिसून येत आहे.यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांचे लग्न जमवितांना पालकांची पूर्ण दमछाक होत आहे.
अनेक गावात मुलाचे लग्न जमवयास हवे म्हणून कर्तव्य असलेल्या तरुणांना काही दिवस शहरात खोली घेऊन राहायला पाठवीत आहेत. जेणेकरून कोठे तरी लग्न जमवून येईल. वधू बरोबर पालक मुलीचे लग्न जमवितांना शहरात राहणारा व स्वतःची खोली, घर असणाऱ्या जावयास पसंती देतांना दिसत आहेत. जो मुलगा गावी राहतो.चांगली आर्थिक स्थिती असली तरी अशा विवाह इच्छुक तरुणांचे लग्न जमवितांना अनेक अडचणींना पालकांना सामोरे जावे लागत आहे.
शिक्षणाचा झालेला प्रसार व शहरांचे आकर्षण यामुळे अशा प्रकारची समस्या पुढे येत असल्यामुळे जाणकार सांगत आहेत. शिक्षण अपूर्ण शहरात राहणाऱ्यांच्या सुविधेचा अभाव यामुळे गावी असलेल्या इच्छुक तरुणांना अनेक ठिकाणी विवाहसाठी प्रस्ताव ठेऊन ही नकार मिळण्याचे प्रमाण वाढत आहे.
लग्नाअभावी वये वाढू लागली
गेली दोन चार वर्षांपासून लग्न जमविण्याची समस्या दिसून येत आहे. एकेकाळी मुलींचे लग्न जमवितांना वडिलांना मुलांचे उबरे झिझावावे लागत होते. उलटपक्षी आता मुलांच्या वडिलांना मुलींचे उबरे झीजवावे लागत असल्याचे दिसून येत आहे आता मुलांचे वय 30 वर्षा पलीकडे गेल्याचे दिसून येत आहे.तरी मुलाचे लग्न जमत नसल्याची खंत मुलांच्या वडिलांकडून व्यक्त करण्यात येत आहे.