

पालघर : हनिफ शेख
जिल्ह्यातील तीन नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आता राजकीय हालचालींना अधिकच वेग आला असून डहाणूमध्ये भाजप विरुद्ध कोणत्याही पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदाचा प्रबळ चेहरा नसल्याने सर्व पक्षांचा शोध सुरू असल्याचे चित्र होते. यामध्ये नुकतेच राष्ट्रवादी (शप)मधून राजू माच्छी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला यामुळे भाजपाला तगडी टक्कर त्यांचाच मित्रपक्ष असलेला शिवसेना देऊ शकेल अशी परिस्थिती डहाणूमध्ये निर्माण झाली आहे.
याच वेळी डहाणू मध्ये भाजप नंतर मोठी ताकद असलेल्या राष्ट्रवादी शपकडे नगराध्यक्ष पदासाठी चेहरा नसल्याने त्यांची पंचायत झाली होती. मात्र आता शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देण्याचे निश्चित झाले असून याला शिवसेना ठाकरे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकतात अशी दाट शक्यता होती. त्यानुसार या तिन्ही पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन सुद्धा हा निर्णय झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे 10 नोव्हेंबर रोजी दै.पुढारीच्या अंकात डहाणूमध्ये भाजप विरुद्ध तिसरी आघाडी होण्याची शक्यता असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते सध्या डहाणू मधील परिस्थिती पाहता हे भाकीत खरे ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.
डहाणूचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत हेच डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले होते. या विरोधात राष्ट्रवादी शपकडून ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष मिहीर शहा लढतील अशी शक्यता होती मात्र मेरी शहा यांनी ही निवडणूक लढण्यात नकार दिल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट नवीन चेहऱ्याच्या शोधात होती.अशावेळी अजित पवार गटाचे नेते रवींद्र फाटक यांना सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळेल असे दिसून येत असतानाच फाटक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यानंतर मात्र डहाणूमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र सध्या डहाणूमध्ये राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र असून यानुसार डहाणू मधील भाजप उमेदवारभरत रजपूत यांच्या विरोधात आता सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येत एक तिसऱ्या आघाडीची तयारी केल्याची खात्रीलायक वृत्त आता समोर येत असून यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना शिंदे गट याशिवाय शिवसेना ठाकरे गट सुद्धा आणि सीपीएम हे सगळे पक्ष मिळून नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार देणार असल्याचे आता दिसून येत आहे.
कारण डहाणू मधील समाज माध्यमावर आता तिन्ही पक्षांचे एकत्रित चिन्ह बनवून डहाणूत निवडणुकीचा नवा अध्याय या मथळ्याखाली ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असताना दिसून येत आहे त्याशिवाय प्रत्यक्ष तशा हालचाली आणि बैठका सुद्धा या तिन्ही चारही पक्षांमध्ये होत असल्याचे दिसून येत होतेच मात्र आता त्याला अधिकृत दुजोरा देखील मिळाला आहे. यामुळे नगराध्यक्ष पद शिवसेना शिंदे गटाकडे तर उर्वरित नगरसेवक पदासाठीच्या जागा या आपापल्या ताकतीनुसार त्या पक्षात वाटून दिल्या जाणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे सुरुवातीला भाजपासाठी सोपी वाटणारी डहाणू नगरपरिषद आता मात्र धोक्याची बनली असल्याचे दिसून येत आहे.
कोण होणार नगराध्यक्ष?
डहाणू नगरपरिषद मध्ये गत पंचवार्षिकला भाजपाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक संख्या पाहता भाजप - 16, राष्ट्रवादी शरद पवार गट - 8 , आणि शिवसेना- 2 असे बलाबल होते.यंदा पुन्हा भाजपाकडून भरत रजपूत हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत.त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण असणार याची उत्सुकता लागलेली असताना आता डहाणूमध्ये स्थानिक पातळीवर वेगळेच राजकीय समीकरण जुळले असून दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित येऊन भाजप विरुद्ध लढणार असल्याचे आता पत्रकार परिषद घेऊन देखील या तिन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.यामुळे आता शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र फाटक आणि भाजपाचे रजपूत यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.