Palghar News : गोवणे गावाला ९६ हेक्टर सामूहिक वनहक्क मंजूर

दशकभराच्या संघर्षाला यश; ग्रामपंचायत कमिटीच्या पाठपुराव्याला यश
Govane Village Forest Rights Claim
Govane Village Forest Rights Claimpudhari photo
Published on: 
Updated on: 

डहाणू : डहाणू तालुक्यातील गोवणे गावाच्या सामूहिक वनहक्क दाव्याला मंजुरी मिळाली असून, गावासाठी ९६ हेक्टर वनक्षेत्र मंजूर झाले आहे. २०१६ मध्ये तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने ठराव घेऊन सुरू केलेल्या प्रक्रियेला सुमारे दहा वर्षांनंतर यश मिळाले आहे. जुन्या ग्रामपंचायत कमिटीने सुरू केलेला पाठपुरावा विद्यमान कमिटी, वनहक्क समिती आणि ग्रामस्थांनी सातत्याने सुरू ठेवल्यामुळे हा अधिकार मिळवण्यात यश आले. या यशाबद्दल विद्यमान ग्रामपंचायत कमिटीने जुन्या कमिटीच्या योगदानाचे अभिनंदन केले.

गोवणे गावाचा समावेश पेसा क्षेत्रात होतो. गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वनक्षेत्राच्या व्यवस्थापनात ग्रामसभेचे अधिकार बळकट करणे, या उद्देशाने सामूहिक वनहक्क मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. २०१३ ते २०१७ या कालावधीत कार्यरत असलेल्या तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने २०१६ मध्ये ठराव घेऊन गावाच्या पारंपरिक वनहक्कांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला.

Govane Village Forest Rights Claim
Western Railway Land Encroachment : बोरिवली-विरार विस्तार मार्गाचा मार्ग मोकळा

त्यानंतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रे, जुने नकाशे आणि पारंपरिक हक्कांचे पुरावे संकलित करून ९६ हेक्टर वनक्षेत्रावरील सामूहिक हक्काचा दावा उपविभागीय व जिल्हास्तरीय समित्यांकडे सादर करण्यात आला. दाव्यातील त्रुटी दूर करणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, यासाठी वन विभाग, महसूल विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

तत्कालीन आणि विद्यमान ग्रामपंचायत कमिटीसह वनहक्क समिती व ग्रामस्थांनीही यासाठी प्रयत्न केले. या प्रक्रियेत माजी सरपंच ललिता कोम, माजी उपसरपंच विलास सुमडा, तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आणि त्या काळातील वनहक्क समितीचे योगदान महत्त्वाचे ठरले. कायदेशीर मार्गाने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळे गावाला हा अधिकार मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमाला प्रशासकीय वन भूमिअभिलेख अधिकारी स्वप्निल साठे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी वन विभागाच्या अधिकारी विद्या मुंडे यांनीही वनहक्क मंजूर झाल्याची माहिती दिली. यावेळी उपसरपंच संदीप टोकरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोम, माजी उपसरपंच विलास सुमडा, माजी सदस्य विलास सापटा, वनहक्क समितीचे अध्यक्ष आनंद वायेडा, वन संसाधन समितीचे अध्यक्ष शैलेश सुमडा, सचिव मधु सुतार, वनधारक लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Govane Village Forest Rights Claim
Raigad School Repair Fund : रायगडमधील २० हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

पारंपारिक वनहक्कांना मान्यता

दशकभराच्या पाठपुराव्यानंतर मिळालेल्या या मंजुरीमुळे गोवणे गावाच्या पारंपरिक वनहक्कांना मान्यता मिळाली असून, वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामसभेला महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.