

पालघर : हनिफ शेख
संपूर्ण पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल पाहता ज्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले त्याच पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आल्याचे स्पष्ट चित्र आहे. मात्र याला अपवाद ठरला आहे.तो डहाणूनगर परिषदेचा निकाल. कारण की या ठिकाणी भाजपा विरोधात झालेल्या सर्वपक्षीय आघाडीने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला. मात्र नगरसेवकांच्या जागा 27 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाला फक्त 2 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस (शप )पक्षाला 8 जागा मिळाल्या आणि उर्वरित तब्बल 17 जागेवर भाजप विजयी झाला. यामुळे डहाणूमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याचे दिसून येत आहे.
यावरून आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.तर जिल्ह्यात भाजप नंबर एक वरच असल्याचा ते खाजगीत दावा करत असून डहाणू मध्ये देखील 17 जागा जिंकून भाजप जिंकली आहे.आणि भरत रजपूत हरले आहेत अशी देखील टीका आता त्यांच्यावर होताना दिसत आहे.
यावरूनच विरोधक ज्याप्रमाणे रजपूत यांच्यावर अहंकाराचा आरोप करत होते.त्याचप्रमाणे स्वपक्षातील विरोधक देखील रजपूत याच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचेच या निकालातून दिसून आले. तर आता या निकालानंतर रजपूत यांच्यासमोर विरोधी पक्षांबरोबरच स्वपक्षीय विरोधकांचे सुद्धा नव्हे आव्हान उभे राहिले आहे.
पालघर जिल्ह्यात महायुतीमध्ये सुरुवातीच्या काळापासूनच तणाव दिसून आला यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी वेळोवेळी विरोधकांना शिवसेनेचे काम देखील केले होते.जाहीर भाषणातून किंवा प्रसार माध्यमातून वक्तव्य करताना जिल्ह्यात 70 टक्के भाजपा आणि उरलेल्या 30% सर्व पक्ष असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून वेळोवेळी करण्यात आला होता.याचबरोबर जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांना त्यांनी गळाला लावले होते अनेक प्रवेश देखील त्यांच्यामुळे वादग्रस्त ठरले होते.
रजपूत यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांजवळ असलेली जवळीक यामुळे त्यांचा वारू चौफेर उधळल्याचे एकूणच चित्र जिल्ह्यात दिसून येत होते. याचवेळी विरोधी पक्ष तर त्यांच्या विरोधात होताच मात्र मित्र पक्ष सुद्धा त्यांच्या विरोधात गेला आणि त्यांच्या एकला चलो रे कारभारामुळे पक्षांतर्गत विरोधक देखील मोठ्या प्रमाणावर तयार झाले मात्र रजपूत यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संबंधांमुळे खुलेआम त्यांच्या विरोधात कोणीही जाण्यास धजावत नव्हता यामुळे रजपूत यांचा अतिआत्मविश्वास वाढला आणि त्यातूनच अहंकाराने जन्म घेतल्याचे आता त्यांचे विरोधक बोलत आहे. आणि याच अहंकार, लंका दहन, रावणाचे दहन या शब्दांचा प्रयोग डहाणूमध्ये त्यांच्या बाबतीत व्हायला लागला.
अशावेळी भूमिपुत्रविरोधात परप्रांतीय, दादागिरी असे मुद्दे घेऊन ही संपूर्ण लढाई रजपूत विरुद्ध डहाणूकर असे चित्र निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला आणि रजपूत यांचा दारुण पराभव झाल्याचे दिसून आले. मुळात पराभवाची कारणे शोधताना एकूण 27 पैकी ज्या पक्षाचे 17 नगरसेवक निवडून येतात. त्या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तब्बल 4 हजार 55 मतांनी पडतो यातच या पराभवाचे गणित समोर येत आहे.
नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्या विजयात राष्ट्रवादी (शप) चा सिंहांचा वाटा
मुळात जेव्हा नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी डहाणूमध्ये भरत रजपूत यांच्या विरोधात कोण लढेल याबाबतच प्रश्नचिन्ह होते कारण की रजपूत ताकद मोठी असल्याचे मानले जात होते. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मातब्बर नेते मिहीर यांनी निवडणुकीतूनच माघार घेतली होती. अशावेळी माजी नगरसेवक राजेंद्र माच्छी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येथूनच रजपूत यांच्या विरोधातील राजकीय घडामोडींना वेग आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेते शिवसेनेला जाऊन मिळाले तर काहींनी राष्ट्रवादीतच राहून रजपूत यांना हरविण्याचे मनसुबे बनविले. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, रवींद्र फाटक यांची शिताफी कामी आली.
अवघ्या महिनाभराच्या अवधीतच रजपूत यांच्या विरोधात एक मोठा गट एकत्र आल्याचे दिसून आले कारण की याआधी डहाणू मध्ये शिवसेनेची ताकद अगदीच नगण्य होती. मात्र कमी वेळात या ठिकाणी शिवसेनेने ताकद तयार केली.सर्वात मोठी साथ लाभली ती राष्ट्रवादी शरद पवार गटाची. वाटाघाटी मध्ये 8 जागेवर लढलेल्या राष्ट्रवादीने आठही जागेवर विजय मिळवला आणि या प्रभागातून मोठे मताधिक्य सुद्धा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले माच्छी यांना मिळाल्याचे दिसून येत आहे.