

ठाणे : दात काढताच नजर गेली, डोळ्यांसमोर अंधुकता आली अशी अफवा वर्षानुवर्षे पसरली असली, तरी नेत्रतज्ज्ञांच्या मते हा समज पूर्णतः चुकीचा आणि धोकादायक आहे. दात काढणे आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणे यांचा कोणताही थेट संबंध नाही. सिव्हिल रुग्णालयाच्या नेत्र तज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी स्पष्ट केले की, डोळ्यांपर्यंत जाणाऱ्या नसा आणि दात-जबड्याशी संबंधित नसा वेगळ्या असल्याने दात काढल्यामुळे नजर कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
डोळ्यांची नजर कमी-जास्त होण्याचा संबंध पूर्णपणे डोळ्यांच्या आरोग्याशी आणि ऑप्टिक नर्व्हशी आहे. दात काढणे किंवा दंतशस्त्रक्रिया यांचा डोळ्यांच्या दृष्टीशी थेट काहीही संबंध नसतो. डोळ्यांपर्यंत जाणाऱ्या नसा आणि दात-जबड्याशी संबंधित नसा वेगळ्या असल्याने दात काढल्यामुळे नजर कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
नेत्रतज्ज्ञ स्पष्ट करतात की, डोळ्यांची दृष्टी मेंदूपर्यंत नेणारी ऑप्टिक नर्व्ह ही पूर्णपणे स्वतंत्र प्रणाली आहे. तर दात, हिरड्या व जबड्याशी संबंधित संवेदना ट्रायजेमिनल नर्व्हद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे दंत उपचारांचा डोळ्यांच्या कार्यक्षमतेवर कोणताही कायमस्वरूपी परिणाम होत नाही.
काही रुग्णांना दात काढल्यानंतर तात्पुरती धूसर दृष्टी, चक्कर येणे किंवा डोळ्यांवर ताण जाणवू शकतो. मात्र नेत्रतज्ज्ञांच्या मते हे लक्षण डोळ्यांच्या आजाराचे नसून भूल औषधांचा परिणाम, मानसिक ताण, वेदना, रक्तदाबातील बदल किंवा थकवा यामुळे काही काळासाठी जाणवते आणि विश्रांतीनंतर आपोआप कमी होते.
नेत्रतज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, अनेकदा वाढत्या वयामुळे, मोबाईल-स्क्रीनचा अति वापर, मधुमेह, रक्तदाब किंवा मोतिबिंदूसारख्या आजारांमुळे नजर कमी होत असते. मात्र हा बदल योगायोगाने दात काढल्यानंतर लक्षात आल्याने “दात काढल्यामुळेच नजर गेली” असा चुकीचा निष्कर्ष काढला जातो.
दृष्टीत बदल झाल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
डोळ्यांच्या दृष्टीत बदल जाणवल्यास त्यामागचे खरे कारण शोधण्यासाठी नेत्रतपासणी करून घ्यावी. दात काढल्यानंतर डोळ्यांत तीव्र वेदना, सतत धूसर दिसणे, दुहेरी प्रतिमा दिसणे किंवा अचानक दृष्टी कमी होणे, अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सामान्य दात काढण्याच्या प्रक्रियेमुळे डोळ्यांची नजर कमी होत नाही, हे नेत्रवैद्यकीय विज्ञानाने स्पष्टपणे सिद्ध केलेले वास्तव असून अफवा व अज्ञानावर आधारित भीती दूर करण्याची गरज आहे.
डॉ. शुभांगी अंबाडेकर, नेत्रतज्ज्ञ, सिव्हिल रुग्णालय ठाणे