

वसई : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून नाताळ सण 25 डिसेंबर रोजी साजरा केला जात असला, तरी त्याचे वेध ख्रिस्ती बांधवांना चार आठवडे आधीच लागलेले असतात. 25 डिसेंबरच्या आधीचे चारही रविवार हे प्रभू येशूच्या आगमन काळातील महत्त्वाचे टप्पे मानले जाऊन, या प्रत्येक रविवारी चर्चेस मधून विविध प्रतीकांचे संकेत म्हणून मेणबत्त्या लावल्या जातात. त्यानुसार रविवार, 30 नोव्हेंबरपासूनच या सणाला सुरुवात झाली असून या दिवशी आलेला रविवार हा चार पवित्र रविवारांपैकी पहिला रविवार असल्याने वसई विरार चर्चेस मधून जांभळी मेणबत्ती पेटवून धार्मिक विधीसाठी ख्रिस्ती बांधवा एकत्र आले होते. प्रभू येशू ख्रिस्ताला लहान निरागस मुले अधिक भावतात. म्हणून वसई विरारमधील चर्चमध्ये खासकरून लहान मुलांच्या हस्ते मेणबत्त्या लावून आगमन काळाचे उद्घाटन करण्यात आले.
चर्चचे उपासना वर्ष हे आगमन काळाच्या पहिल्या रविवारी सुरु होते. 25 डिसेंबर पूर्वी चार रविवार हे आगमन काळातील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा रविवार अशा नावाने ओळखले जातात. पहिल्या तीन रविवारी जांभळ्या रंगाच्या तर चौथ्या रविवारी गुलाबी रंगाच्या मेणबत्त्या पेटविण्यात येतात. चार मेंणबत्त्याचे वेगवेगळे प्रतीकात्मक अर्थ मानले जातात. पहिला रविवार आशा, दुसरा रविवार शांती, तिसरा रविवार आनंद, तर चौथा रविवार प्रीती होय!
ख्रिस्ती धर्मश्रद्धेनुसार, जांभळा रंग आशेचे प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मानवाच्या कल्याणासाठी जगात येत आहेत, या आशेची जाणीव ही मेणबत्ती प्रज्वलित केल्याने होते. येशूच्या जन्माच्या सातशे वर्षांपूर्वी संदेष्टा यशयाने त्याच्या जन्माचे भाकीत करून लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून ही जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावली जाते. आगमन काळातील पहिल्या रविवारी सेंट थॉमस चर्च, सांडोर येथे फादर अँड्य्रू रॉड्रिग्ज आणि फादर ज्योयल कोरिया यांनी जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावून नाताळ सणाच्या आगमनाची तयारी सुरु करण्यात आली.