

वाडा : वाडा तालुक्यातील गौरापुर ( कातकरी वाडी ) गावात 10 वर्षीय मुलीला उत्तन येथे मच्छी सुकविणे व घरकाम करण्यासाठी गुंतविण्यात आले होते. तिच्या मनाच्या विरुद्ध जबरदस्तीने कोंडून ठेवल्याच्या तक्रारीवरून वाडा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून विविध कलमांच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उत्तन चौक, भायंदर येथील एका महिलेने गौरापूर गावातील एका अल्पवयीन मुलीला घरकाम व मच्छी कामासाठी जबरदस्तीने नेले होते. मुलगी लहान असल्याने कामात थोडीफार दिरंगाई झाली की शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचे मुलीच्या आईचे म्हणणे आहे. वर्षभरापासून हा प्रकार सुरू असून कुटुंबाला बदल्यात केवळ 5 ते 6 हजार रक्कम देण्यात आली होती. मंगळवारी आरोपी महिला गौरापूर येथे येऊन मुलीला पुन्हा कामावर घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागल्याने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देण्यात आली.
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने वाडा पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल करताच गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय किन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रभा राऊळ गुन्ह्याचा पुढील तपास करीत असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. वाडा तालुक्यातील अल्पवयीन मुलींची विवाहासाठी होणारी विक्री चिंतेचा विषय असताना कामासाठी बालकामगार म्हणून राबविली जाणारी ही पद्धती धक्कादायक असून याबाबत प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.
दरम्यान अल्पवयीन कातकरी समाजातील मुलींची पैशांसाठी होणारी विक्री हा पालघर व ठाणे जिल्ह्याला शाप असून आतापर्यंत वाडा, कासा, जव्हार, गणेशपुरी, शहापूर अशा विविध पोलीस ठाण्यात याबाबत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र ठोस कारवाई अद्याप होताना दिसत नाही म्हणूनच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून बालमजुरी,बालविवाहसाठी मुलींची विक्री अशा घटना वाढतच आहे.
पोलिसांविरोधातही आगपाखड
दरम्याम वाडा तालुक्यासह पालघर व ठाणे जिल्ह्यातील विविध भागात अल्पवयीन कातकरी समाजाच्या मुलींची परजिल्ह्यात विवाहासाठी होणारी विक्री चिंतेचा विषय बनला आहे. तालुक्यातील मांगाठणे गावात दलालामार्फत एका अल्पवयीन मुलीचे लग्न संगमनेर येथील एका तरुणाशी ठरविण्यात आले असून पैशांच्या मोबदल्यात होणारा हा बालविवाह श्रमजीवी संघटनेच्या हस्तक्षेपानंतर रोखण्यात प्रशासनाला यश आले. वाडा पोलिसांनी मात्र त्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात कुचराई केल्याने गंभीर गुन्हा असूनही कुणालाही ठोस शासन झाले नाही असे सरचिटणीस विजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान अशा वाढत्या घटनांविरोधात पोलिसांच्या या हलगर्जीचा निषेध करण्यासाठी शेकडो महिलांनी पोलिस ठाण्याच्या बाहेर तब्बल 3 तास नुकतेच मूक आंदोलन केले.