

डहाणू : पालघर जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमे अंतर्गत तलासरी आणि घोलवड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत चरस विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 12 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर या मोहिमेला गती मिळाली आहे. त्यानुसार 6 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सुमारे 12 वाजून पाच मिनिटांच्या सुमारास तलासरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, घोलवड पोलिस ठाणे हद्दीतील चिखला बीच परिसरात एक व्यक्ती चरस विक्रीसाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तलासरी पोलिसांनी घोलवड पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी सापळा रचला. पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी थांबवून चौकशी केली. त्याने आपले नाव सायमन वळवी (40) रा. कैनाड कडुपाडा असे सांगितले. त्यानंतर त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता हँडलला बांधलेल्या प्लास्टिक पिशवीत सुमारे 600 ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला, ज्याची किंमत सुमारे 12 लाख रुपये इतकी आहे.
याशिवाय आरोपीकडून मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण 12 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साहेबराव कचरे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड, घोलवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव कचरे, पो उप. नि. विकास दरगुडे, हिरामण खोटरे, पोअं. योगेश मुंडे (तलासरी पोलीस ठाणे), तसेच पो.उप.नि. परमेश्वर जाधव, अविनाश पाटील,आदींनी सहभाग घेतला. पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.