

डहाणू : ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला बचत गटांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या फळ-भाजीपाला प्रक्रिया प्रणालीला भारतीय पेटंट मिळाले आहे. बोर्डी येथील महिला शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या रुवान फूडटेक-ऑरा ग्रीन या स्टार्ट-अप संस्थेने हे यश संपादन केले आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करता येत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वाया जाणाऱ्या फळ-भाजीपाल्याचे जतन करणेही शक्य झाले आहे.
सध्या शहरांमध्ये नैसर्गिक आणि रसायनमुक्त खाद्यपदार्थांना मोठी मागणी आहे. मात्र ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांना अन्न प्रक्रिया उद्योगाच्या नियमांनुसार प्रक्रिया करणे, उत्पादनाचे मूल्यवर्धन करणे आणि बाजारपेठेत विक्री करणे कठीण ठरते. प्रक्रिया यंत्रणांची जास्त किंमत, विजेची कमतरता आणि वाढता खर्च या अडचणींमुळे अनेकांना हा व्यवसाय करता येत नाही.
या सर्व समस्यांवर उपाय म्हणून ही सौरऊर्जेवर चालणारी प्रक्रिया प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा महाराष्ट्रातील 50 हून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला असून भविष्यात देशातील शेतमाल प्रक्रिया उद्योगाला नवी दिशा मिळेल, अशी माहिती संस्थापिका विदुला पाटील, हिमाली वर्तक आणि प्रियंका राऊत यांनी दिली.
ही प्रणाली पूर्णपणे सौरऊर्जेवर चालत असल्यामुळे विजेची गरज लागत नाही. वापरण्यास अतिशय सोपी असून तिच्या देखभालीसाठी कोणताही मोठा खर्च येत नाही. या प्रक्रियेमुळे फळ-भाजीपाल्यातील पोषक घटक, नैसर्गिक रंग, चव आणि सुगंध कायम राहतात. विशेष म्हणजे विविध पदार्थ केवळ 3 ते 12 तासांत सुकवता येतात. या पद्धतीने तयार होणारी उत्पादने 100 टक्के नैसर्गिक आणि रसायनमुक्त असल्यामुळे निर्यातीसाठीही योग्य ठरतात.
आयुर्वेदिक वनस्पतींवर प्रक्रिया करण्यासाठी ही प्रणाली विशेष उपयुक्त असून हॉटेल व औषध निर्मिती उद्योगांसाठीही आवश्यक सामग्री तयार करता येते. या प्रणालीवर आतापर्यंत 50 हून अधिक फळे, भाज्या, पालेभाज्या, औषधी वनस्पती तसेच विविध प्रकारच्या माशांवर यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. या पद्धतीने प्रक्रिया केलेला शेतमाल 3 ते 12 तासांत सुकून सुमारे बारा महिन्यांपर्यंत सुरक्षितपणे साठवता येतो. नैसर्गिक पद्धतीने सुकवण्याच्या तुलनेत ही पेटंटेड प्रक्रिया सुमारे तीन पट अधिक कार्यक्षम असल्याचे संशोधक निनाद पाटील आणि निमिष राऊत यांनी सांगितले.
या प्रणालीद्वारे आंबा, फणस, कोकम, सुपारी, अननस, द्राक्ष, चिकू, स्ट्रॉबेरी, पपई, केळी, अंजीर, संत्रे, मोसंबी, रानफळे, नारळ, अवाकाडो, सफरचंद यांसह टोमॅटो, कांदा, आले, लसूण, बीटरूट, कारले, भेंडी, वांगी, गाजर, मुळा, शेवग्याच्या शेंगा, गवार, मेथी अशा पालेभाज्या तसेच गुलाब व जास्वंदीच्या पाकळ्यांवर प्रक्रिया करता येते. तसेच करंदी, सोडे, पापलेट, बांगडा यांसारख्या माशांचे सुकवलेले पदार्थही तयार करता येतात.