

बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या भूखंडांवर वाढलेले सुकलेले गवत आणि झुडपे आता आगीच्या घटनांना निमंत्रण देत असल्याचे चित्र समोर आले आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास निरलॉन कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या भूखंडावरील सुकलेल्या झुडपांना अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. त्यामुळे लगतच्या कंपन्यांमधील कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच तारापूर अग्निशमन दलाच्या दोन अग्निशमन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मोठे आर्थिक नुकसानही टळले आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, तारापूर औद्योगिक वसाहतीतील अनेक मोकळ्या भूखंडांवर सुकलेले गवत, काटेरी झुडपे तसेच टाकाऊ साहित्य मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. पावसाळ्यानंतर हे गवत वाळून जात असल्याने उन्हाळ्यापूर्वीच नव्हे, तर सध्याच्या कोरड्या वातावरणातही आगीचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे या परिसरात रासायनिक कंपन्यांसह अनेक संवेदनशील औद्योगिक आस्थापना आहेत.
अशा ठिकाणी एखाद्या मोकळ्या भूखंडावर लागलेली आग वेळीच आटोक्यात आली नाही, तर तिचे स्वरूप गंभीर होऊन मोठ्या औद्योगिक दुर्घटनेला निमंत्रण मिळू शकते. औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार की वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.