

ठाणे : ठाणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाला पाणीपुरवठ्याचे नियोजन मात्र पुरेसे ठरत नसल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. एकीकडे शहरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत असताना दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिकेकडून १० टक्के, एमआयडीसीकडून २० टक्के आणि ठाणे महापालिकेकडून १० टक्के अशा एकूण ४० टक्के पाणी कपातीचा फटका शहराला बसत आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांमुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीतही घट होत असल्याने पाण्याचे संकट अधिकच गंभीर बनले आहे. साकेत येथील टँकर भरणा केंद्रावरून दररोज ७५ ते ८० टँकरची मागणी होत असून, खासगी टँकरसाठी नागरिकांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ठाणेकरांसाठी पाणी ही मूलभूत गरज न राहता आर्थिक भुर्दंड ठरू लागली आहे.
ठाणे शहराचा विस्तार गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. विशेषतः घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले असून, लोकवस्तीमध्येही मोठी वाढ झाली आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची उपलब्धता आणि वितरण व्यवस्था सक्षम झाली आहे का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नवीन इमारतींना बांधकाम परवानग्या देताना भविष्यातील पाण्याची गरज, उपलब्ध जलस्रोत आणि पायाभूत सुविधांवरील ताण यांचा पुरेसा विचार केला जातो का, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या ठाणे शहराला दररोज ६२७ एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ ५९० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली आहे. म्हणजेच दररोज सुमारे ४२ एमएलडी पाण्याची तूट निर्माण होत आहे. त्यातच विविध स्रोतांकडून पाणी कपात लागू झाल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची दमछाक होत आहे.
पाण्याची मागणी आणि उपलब्धता यातील ही तफावत केवळ उन्हाळ्यापुरती मर्यादित राहणार की भविष्यात ठाणेकरांसाठी कायमस्वरूपी डोकेदुखी ठरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दररोज साकेत येथील टँकर भरणा केंद्रावरून ७५ ते ८० टँकरची मागणी होत असल्याने शहरातील पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे. ठाणे महापालिकेकडून सुरुवातीला १५ ते २० टँकर मोफत उपलब्ध करून दिले जातात.
त्यानंतर प्रत्येक टँकरमागे एक हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती आहे. तर १० हजार लिटर पाण्यासाठी ७०० रुपये आकारले जातात. दुसरीकडे खासगी टँकरसाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत असल्याने सोसायट्यांच्या मासिक खर्चात मोठी वाढ होत आहे.
पाणीपुरवठा नियमित नसल्याने अनेक सोसायट्यांना आठवड्यातून अनेकदा टँकर मागवावे लागतात. परिणामी, घरगुती देखभाल खर्चाबरोबरच पाण्याचा अतिरिक्त आर्थिक भारही रहिवाशांवर पडत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम सोसायट्या खासगी टँकर मागवून तात्पुरती गरज भागवत असल्या, तरी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नाही.
विकासकांना पाणी कुठून मिळते ?
घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असताना या बांधकामांसाठी वापरले जाणारे पाणी नेमके कुठून उपलब्ध होते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे रहिवाशांना पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असताना बांधकामांच्या ठिकाणी पाणीपुरवठा कसा सुरू आहे, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या टँकरचे दर आणि खासगी टँकरचे दर यामध्ये मोठी तफावत असल्याने टँकर पुरवठा व्यवस्थेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकाच शहरात, एकाच पाणीटंचाईच्या परिस्थितीत टँकरच्या दरांमध्ये एवढी तफावत का, टैंकर भरणा केंद्रावर पाण्याचे वितरण कोणत्या नियमांनुसार होते, खासगी टँकर व्यावसायिकांना पाणी कुठून उपलब्ध होते, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे. विकासक आणि टँकर व्यावसायिकांमध्ये काही लागेबांधे आहेत का, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात असली तरी त्याबाबत ठोस पुरावे आणि अधिकृत चौकशी आवश्यक आहे.
याशिवाय टँकर भरणा केंद्रावरील पाण्याचे वितरण, टँकरची संख्या, आकारले जाणारे दर आणि पाणी कोणत्या भागात पुरवले जाते, याची माहिती सार्वजनिक केल्यास या व्यवस्थेत पारदर्शकता येऊ शकते. खासगी टँकरच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
विकासाचे नियोजन नेमके कोणासाठी
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, याच शहरातील नागरिकांना आज पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, ही विसंगती विकासाच्या दाव्यांपुढे अनेक प्रश्न उमे करणारी आहे. शहरात उंच इमारती, रुंद रस्ते आणि मोठे प्रकल्प उभे राहत असताना नागरिकांच्या घरातील नळाला नियमित पाणी मिळणार नसेल, तर या विकासाचे नियोजन नेमके कोणासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईकडे केवळ तात्पुरते संकट म्हणून न पाहता भविष्यातील ठाण्याच्या पाणी सुरक्षेचा गंभीर प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.