

बोईसर : संदीप जाधव
बोईसर आगारातून कोल्हापूर-ज्योतिबासाठी निघालेल्या एसटी बसचा चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पालघर येथील मनोरकडे जाणाऱ्या चाररस्त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. या बसमध्ये सुमारे २० प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास बोईसर आगारातून एसटी बस (क्र. एमएच १४ एमएच ०६५३) कोल्हापूर-ज्योतिबाच्या दिशेने रवाना झाली होती. रात्री साडेआठच्या सुमारास पालघर येथील मनोरकडे जाणाऱ्या चाररस्त्यावर वाहतूक पोलिसांनी बस थांबवून चालकाची तपासणी केली. पालघर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर आणि त्यांच्या पथकाने अल्कोहोल तपासणी यंत्राद्वारे चालक महेश अशोक सरोदे यांची तपासणी केली. यावेळी चालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बोईसर आगार प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.
या प्रकरणी बोईसर आगार व्यवस्थापक प्रसाद जाधव यांनी सांगितले की, संबंधित चालकाची सध्या कामगिरी बंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. पालघर येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
प्रवाशांच्या जीवाशी संबंधित अशा गंभीर प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने चालकांची नियमित तपासणी करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.
एसटी प्रशासनाच्या तपासणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चालक आणि प्रशासनाची असते. असे असताना चालकाने मद्यप्राशन करून बस चालविल्याचा प्रकार समोर आल्याने एसटी प्रशासनाच्या तपासणी व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. बस मार्गस्थ होण्यापूर्वी चालकांची मद्यप्राशन तपासणी केली जाते का, असा सवालही या घटनेनंतर उपस्थित होत आहे. वेळीच पोलिसांनी तपासणी केली नसती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.