School junk food ban : शाळांच्या परिसरात जंक फूडसोबत तंबाखूजन्य पदार्थांचीही विक्री

बोईसरमधील प्रकार; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
school junk food ban
school junk food banpudhari photo
Published on
Updated on

बोईसर : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या परिसरात तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात जंक फूड आणि जास्त प्रमाणात फॅट, साखर व मीठ असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर, जाहिरातीवर तसेच मोफत वाटपावर निर्बंध घातले आहेत. मात्र बोईसर शहरासह बोईसर पूर्वेकडील शाळा-महाविद्यालय परिसरात या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे काही टपऱ्या व दुकानांमधून विद्यार्थ्यांच्या आवाक्यात सिगारेट, तंबाखू आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असताना त्यांच्या आरोग्यास घातक असलेले खाद्यपदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असतील, तर प्रशासनाच्या संबंधित आदेशांचा आणि तंबाखू नियंत्रणाच्या नियमांचा प्रत्यक्ष फायदा विद्यार्थ्यांना किती मिळत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

school junk food ban
Bharat Gogawale : दासगाव पुलाला कै. शांताराम भाऊ फिलसे यांचे नाव देणार

अन्न व औषध प्रशासनाच्या निर्देशानुसार शाळेच्या आवारात तसेच प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरात उच्च प्रमाणात फॅट, साखर आणि मीठ असलेल्या खाद्यपदार्थ व पेयांची विक्री, जाहिरात किंवा मोफत वाटप रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वडापाव, समोसा, चिप्स, बर्गर, चॉकलेट, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स आणि तत्सम खाद्यपदार्थांबाबत हा नियम लागू आहे.

शाळेतील कॅन्टीन व विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या संबंधित आस्थापनांकडे आवश्यक FSSAI परवाना किंवा नोंदणी असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात बोईसर शहर आणि बोईसर पूर्व परिसरातील काही शाळा-महाविद्यालयांच्या आसपास खाद्यपदार्थांच्या टपऱ्या व दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची खरेदी केली जाते. त्याचबरोबर काही टपऱ्यांवर सिगारेट, तंबाखू, गुटखा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थही उपलब्ध होत असल्याचा आरोप पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वाटेवरच तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत असतील तर तंबाखूमुक्त समाजाचे उद्दिष्ट कसे साध्य होणार? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळा-महाविद्यालय परिसरात अशा पदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

school junk food ban
MMRDA bridge Thane : कासारवडवली-खारबाव पुलासाठी ३३९ वृक्षतोडीचा घाट

विद्यार्थ्यांच्या शाळेच्या ५० मीटर परिसरात नेमके काय विकले जाते, याची तपासणी करण्यासाठी प्रशासन प्रत्यक्ष मैदानात कधी उतरणार? तक्रार करणाऱ्यालाच कारवाईची भीती वाटत असेल तर गैरप्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणार कशी? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंढेंचा आदेश पालघरमध्ये कागदावरून प्रत्यक्षात कधी उतरणार? हा प्रश्न आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शाळांच्या परिसरातील परिस्थिती केवळ जंक फूडपुरती मर्यादित नसून तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचाही गंभीर प्रश्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी केवळ तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याऐवजी शाळा-महाविद्यालय परिसरात अचानक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

बोईसर शहर, बोईसर पूर्व आणि परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर परिसरातील टपऱ्या व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची संयुक्त तपासणी करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासनासोबत स्थानिक प्रशासन आणि तंबाखू नियंत्रणाशी संबंधित यंत्रणांनीही प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

तक्रार केल्यानंतर ‘उद्या पाहणी’?

दरम्यान, संबंधित प्रकाराची माहिती प्रशासनाला देण्यासाठी नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर प्रथम ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला जात असल्याचा अनुभव काही तक्रारदारांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहणी केली जाईल, असे सांगितले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे तक्रारदारांकडूनच आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, प्रशासनाला तक्रार मिळाल्यानंतर पाहणी दुसऱ्या दिवशी होणार असेल तर संबंधित दुकान किंवा टपरीवर कारवाई होईपर्यंत नियमबाह्य पदार्थांची विक्री सुरू राहणार नाही याची खात्री कोण करणार? असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news