

खाडीपट्टा : रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांची मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. कुणबी समाजोन्नती संघ (मुंबई, शाखा महाड-पोलादपूर) कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुंबई) आणि रावढळ गटाच्या वतीने पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान परिसरातील प्रलंबित पायाभूत विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली.
सत्कार सोहळ्यात उपस्थितांशी संवाद साधताना पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले, स्वर्गीय शांताराम भाऊ फिलसे हे बहुजन समाजाचे खंबीर नेतृत्व होते. त्यांच्या अतुलनीय सामाजिक योगदानाचा सन्मान म्हणून दासगाव पुलाला कै. शांताराम भाऊ फिलसे यांचे नाव दिले जाईल. हा पूल पूर्ण झाल्यास महाड, पोलादपूर, खेड, दापोली आणि मंडणगड परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधींना मोलाचा सल्ला देताना ते पुढे म्हणाले, पद कोणतेही असो—कोणीही त्याचा अहंकार बाळगू नये. मी स्वतः सरपंच पदापासून सुरुवात करून आज इथपर्यंत पोहोचलो आहे, पण पदाची हवा कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मिळालेली ही जबाबदारी सार्थ ठरवून, जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून स्थानिक विकास आणि कोकणातील कला-संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी सदैव तत्पर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने सापे-वामने रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी केली. गोठे-रावढळ येथील बहुउद्देशीय समाज सभागृहापुढील जागेत सभा मंडप व शेड उभारण्यासाठी निधी देण्याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले. याशिवाय, कलगीतुरा परंपरेतील ब्रीद पूजन सोहळ्याचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक तथा रावढळ गट अध्यक्ष एकनाथ सुकूम, महाड तालुका संपर्कप्रमुख इक्बाल चांदले, महाड-पोलादपूर शाखाध्यक्ष सत्यवान यादव, कलगी तुरा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुरेश ऐनारकर, सरचिटणीस संतोष धारशे, सहसचिव सचिन देवळे, युवाध्यक्ष ॲड. विशाल गोलांबडे, सचिव मितेश नवले, कुणबी युवा (मुंबई) उपाध्यक्ष मिलिंद चिबडे, रावढळ गट मुंबई सचिव आनंद दवंडे, परशुराम कदम, नैनेश बैकर, इतेश खोपटकर, गजानन कदम, बबन सकपाळ, संदीप माने, अमोल जागडे, कृष्णा सुकूम, मंगेश जगताप, दिलीप नामे, दामोदर गोरीवले, चंद्रकांत धोपट आणि उदय दणदणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आम्ही कोणत्याही एका घटकाचे नसून सर्व समाजांना सोबत घेऊन चालणारे आहोत. कुणबी समाज आणि कलगी तुरा समाज उन्नती मंडळाच्या सर्व न्याय्य व प्रलंबित मागण्या शासनस्तरावर प्राधान्याने पूर्ण केल्या जातील. महाड-पोलादपूरसह संपूर्ण तालुक्यातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास करणे आणि स्थानिक संस्कृतीचे जतन करणे ही माझी प्राथमिक जबाबदारी असून, ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
भरत गोगावले, पालकमंत्री, रायगड