

बोईसर : बोईसर-नवापूर मार्गावरील पाम टेंभी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. एकाच दुचाकीवरून तिघेजण प्रवास करत असताना हा अपघात घडला.
ऐन उमेदीतील तीन तरुणांचे आयुष्य क्षणात संपल्याने गणेशनगर परिसरासह बोईसरमध्ये शोककळा पसरली आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर केवळ अपघाताची चर्चा न होता बोईसर परिसरातील वाहतूक शिस्त, ट्रिपल सीट प्रवास आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
मोहित राकेश वर्मा, रवी विजय गुप्ता आणि नयना महातो अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. मोहित आणि रवी हे बारावीमध्ये, तर नयना दहावीमध्ये शिक्षण घेत होती. तिघेही बोईसरमधील गणेशनगर परिसरात वास्तव्यास होते. मंगळवारी सायंकाळी तिघेही एकाच दुचाकीवरून नांदगाव-आलेवाडी समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने फिरण्यासाठी निघाले होते. पाम टेंभी गावाच्या हद्दीत नवापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. या दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालकाने वाहन घटनास्थळी सोडून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच बोईसर आणि सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
अपघातानंतर वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
या दुर्घटनेतील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे तिघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे हा मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंग आहे. अशा प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नियमित तपासणी आणि कारवाई अपेक्षित असते. मात्र, बोईसर-नवापूर मार्गावर ट्रिपल सीट प्रवास, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि बेदरकार वाहनचालकांवर कितपत प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
वाहतूक यंत्रणा कुठे?
दुचाकीवर तिघांनी प्रवास करण्याचा निर्णय चुकीचा होता, हे नाकारता येणार नाही. मात्र, अशा नियमभंगाकडे वेळीच लक्ष देऊन कारवाई झाली असती तर अशा धोकादायक प्रवासाला आळा बसण्यास मदत झाली असती का? वाहतूक पोलिसांची नियमित गस्त नेमकी कोणत्या मार्गांवर असते? नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर किती कारवाई केली जाते? बोईसर परिसरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा उपलब्ध आहे का? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.