

बोईसर : बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील वाळवे बसस्टॉप परिसरात झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर यवतमाळ जिल्ह्यातून जेरबंद करण्यात बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शिताफीने माग काढत ही कारवाई करण्यात आली.
बेटेगाव येथे चिकन भुजिंगचे दुकान चालविणारा उमेश मोतीराम घरत याचा फिर्यादी सोबत वैयक्तीक वाद होता.याच रागातून 23 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास आरोपी उमेश घरत याने बेटेगाव-महागाव मार्गावर परिसरातील घरात घुसून सुरेश राजा वरखंडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस पिस्तुलातून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत सुरेश वरखंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेटेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
व आरोपीला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक चंद्रकांत हाके व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला होता. तपासादरम्यान आरोपीने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आवढाणी येथील एका हॉटेलपर्यंत प्रवास केल्याचे उघड झाले. तेथून खाजगी बसने मुंबई गाठून मित्राच्या ट्रकमधून पुणे,
सोलापूर, नांदेड मार्गे यवतमाळकडे पलायन केल्याची माहिती समोर आली. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित ट्रकचा अचूक माग काढत गुन्हे प्रकटीकरण शाखेने महामार्ग पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात भोसा-कोसदनी परिसरातून आरोपीला 1 मार्च रोजी ताब्यात घेत अटक केली. आरोपी उमेश घरत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.