

बोईसर : बोईसर पोलीस ठाणे हद्दीतील वाळवे बसस्टॉप परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला अखेर यवतमाळ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत बोईसर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
बेटेगाव येथे चिकन भुजिंगचे दुकान चालविणाऱ्या उमेश मोतीराम घरत याचे त्याच्याकडे काम करणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध होते. फिर्यादी प्रितेश सुरेश वरखंडे यांनी या संबंधास विरोध दर्शविला होता. मात्र दोघांनी विरोधाला न जुमानता मुरबे येथील मंदिरात विवाह केल्याने वाद अधिकच चिघळला.
या पार्श्वभूमीवर २३ फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे २ वाजता आरोपी उमेश घरत याने बेटेगाव-महागाव मार्गावरील वाळवे बसस्टॉप येथील घरात घुसून प्रितेश वरखंडे यांचे वडील सुरेश राजा वरखंडे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस पिस्तुलातून गोळी झाडली. यात सुरेश वरखंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेदरम्यान आरोपीने प्रितेश वरखंडे व त्यांच्या पत्नीस मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत हाके व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपीने दुचाकीवरून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील आवढाणी येथील सती माता हॉटेलपर्यंत प्रवास केल्याचे उघड झाले. तेथून खाजगी बसने मुंबई गाठून मित्राच्या ट्रकमधून पुणे, सोलापूर, नांदेड मार्गे यवतमाळकडे पलायन केल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित ट्रकचा माग काढत पथकाने महामार्ग पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील भोसा-कोसदनी परिसरातून १ मार्च रोजी आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक करीत आहेत.
या कारवाईमुळे बोईसर परिसरात कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.