

बोईसर, संदीप जाधव : नागझरी-नानिवली रस्त्यावर ओव्हरलोड दगड घेऊन ट्रकनी वाहतूक करणारा ट्रक पलटला. पहाटे जाताना चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. यामुळे नागझरी - नानिवली रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताने ग्रामीण भागातील ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. किराट येथे मोठ्या प्रमाणात दगडांचे खाणीतून उत्खनन केले जाते. त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनातून ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे रस्त्यांची ही दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अशा प्रकारे अवजड वाहतूक करताना वाहन चालकांचा वाहनावरील ताबा नेहमी सोडून अपघात घडल्याचे चित्र या रस्त्यावर पाहायला मिळत असते. याकडे पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि आरटीओ विभागाचे आर्थिक संबंधांमुळे तसेच इथे सुरू असलेल्या दगड खाणीवर माजी मंत्र्यांचा आशीर्वाद असल्यामुळे अनधिकृत कामांवर दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिक दबक्या आवाजात करीत होते.
या अपघातानंतर साधारण दोन तास क्रेनच्या सहाय्याने वाहन हटविण्यासाठी प्रयत्न करीत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. यावेळी अनेक प्रवाशांसह, वाहन चालकांना ताटकळत रांगेत उभे राहावे लागले. विशेष म्हणजे यामध्ये एसटी सेवेचे वेळापत्रक पूर्णपणे खोळंबल्याने प्रवाशांना एसटी थांब्यांवर ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान, मनोर पोलिसांना याबाबत कुठलीही कल्पना न देताच सुरक्षतेची कुठलीही प्रक्रिया पूर्ण न करता क्रेनच्या साह्याने वाहन काढण्याचे काम सुरू असल्याने प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊन संतापाचे वातावरण पाहावयास मिळत होते.