

पाथर्डी शहर :पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात कोदा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील सर्व कांदा रस्त्यावर पसरला होता. या अपघातामध्ये चालक व त्याचा साथीदार यांना किरकोळ स्वरूपाची दुखापत होऊन जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. कांदा भरून जाणारा चौदाचाकी मालट्रक (सीजी 08 एजे 9828) हा माणिकदौंडीकडून पाथर्डीच्या दिशेने येत होता.
माणिकदौंडीच्या धोकादायक वळणावर हा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. यात दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर आणि बाजूला सर्वत्र ट्रकमधील कांदा पडला होता. अपघातग्रस्तांना उपसरपंच समीर पठाण, अमोल शेळके, सतीश आठरे, किशोर राठोड, दिलावर मेजर, गोटू राठोड यांनी मदत केली. याच धोकादायक वळणावर मागील आठवड्यात ट्रक पलटी झाला होता. वारंवार याच जागी अपघाताची मालिका सुरु असून हे धोकादायक वळण काढण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.