खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र 4 वरून पुण्याच्या बाजूकडून मुंबईच्या दिशेने सिमेंटने भरलेला ट्रक खोपोली शिळफाटा हद्दीत आल्यावर बोरघाटाच्या उतरणीवर चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.
अधिक वाचा : 'मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?'
या अपघातावेळी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी ट्रकमधून चालकाने उडी मारली. मात्र यात त्याचा मृत्यू झाला. तर याच मार्गावर एक पादचारी इसम ट्रकखाली सापडल्याने त्याचाही चिरडून मृत्यू झाला. अशा प्रकारे या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. सदरचा अपघात शिळफाटा रायगड बाजाराजवळ आज (गुरूवार) सकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान घडला. ट्रक पलटी झाल्याने या ट्रकमधील सिमेंटची गोणी रस्त्यावर पसरली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ थाबली होती. मात्र मदतकार्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.