

A political stunt on the Wada-Bhiwandi road?
वाडा : मच्छिंद्र आगिवले
मनोर वाडा भिवंडी या महामार्गाची झालेली दुर्दशा हा राज्यातील सर्वात महत्वाचा व आतापर्यंत चर्चेत राहणारा विषय असून वेगवेगळी सत्तांतर झाली मात्र मागील १५ वर्षात या महामार्गावर केवळ राजकीय व सरकारी पैशांचा चिखल पहायला मिळाला आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या एका खाजगी कंपनीला देण्यात आले असून त्यांच्या दिरंगाईची झळ सध्या लोकांना सोसावी लागत आहे. आमदार शांताराम मोरे यांनी या मार्गाच्या दुर्दशेचे प्रतिकात्मक वास्तव दाखविण्यासाठी स्वतः घमेल्यात माती वाहून खड्ड्यात टाकल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या या कृतीवर अनेकांनी टीका करून ही सरकारची हतबलता आहे का असा सवाल विचारला आहे.
मनोर वाडा भिवंडी या महामार्गावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून एकेरी बाहतूक अतिशय धोकादायक बनली आहे. गुडघ्याइतक्या खड्ड्यातून वाहने काढताना चालकांच्या नाकीनऊ येत असून सध्या पावसाळ्यात तर हा रस्ता महामार्ग आहे की शेतावरील चिखलाची पायवाट आहे असा प्रश्न लोकांना पडला आहे. खरेतर एका खाजगी कंपनीला जवळपास ८०० कोटींच्या आसपास निधी खर्चुन रस्त्याचे काम दिले आहे मात्र रस्त्याची अवस्था आजही दयनीय झालेली आहे. काही ठिकाणी काँक्रीटीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत मात्र त्यावरून वाहतूक अजूनही नीट सुरू नसून जुन्या पर्यायी मार्गावर खड्ड्यांमुळे चालणे अवघड बनून वाहनाच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत.
दोन खासदार व तीन आमदार लाभलेल्या या भागात मात्र प्रचंड राजकीय अनास्था पाहायला मिळत असून १५ वर्षापासून येथील जनता अवघ्या ४२ किमी अंतराच्या मार्गासाठी टोकाचा संघर्ष व असुविधांचे चटके सहन करीत आहे. महामागनि खरेतर जीवनाला गती मिळते मात्र मनोर वाडा भिवंडी या महामार्गावर आजपर्यंत शेकडो जणांनी आपला प्राण गमावला असून जखमींची संख्या तर मोजण्या पलीकडे आहे. मुसळधार पावसामुळे नेहरोली गावाजवळ रस्ता वाहन गेल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते ज्याची पाहणी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केल्याने तेही टीकेचे धनी बनले होते.
रविवारी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी हातात घमेले व फावडे घेऊन खड्डे भरल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यांचावर विविध स्तरावर सडकून टीका करण्यात आली. मोरे हे शिंदेंच्या सेनेतील महत्त्वाचे शिलेदार असून सध्या सत्तेत असलेल्या सरकारच्या लोकप्रतिनिधीनेच कंत्राटदाराला धारेवर धरून त्याला कायदेशीर इंगा दाखवायचे सोडून हाती घमेले घेऊन खड्डे भरावे हे सरकारी अनास्थेचे प्रतीक आहे असे लोकांचे म्हणणे आहे.
आमदार मोरे यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिली नसली तरी शिवसेनेचे प्रकाश पाटील यांनी मात्र सर्व स्तरावर आम्ही कागदोपत्री पाठपुरावा करीत आहोत असे सांगितले. त्यामुळे नेमका या रस्त्याचा प्रश्न कधी सुटेल असा सवाल नागरिकांना पडला आहे.
वाड्यातील उबाठा गटाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन महामार्गासह पर्यायी मार्गाची झालेली दुर्दशा लोकांची कोंडी करणारी असून याबाबत तातडीने बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी केल्याचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले. अंबाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार व अन्य काही तरुणांनी रस्त्याच्या दुर्दशेचे व्हिडिओ बनवून कंत्राटदारांची चांगलीच पोलखोल केली आहे. श्रमजीवी संघटनेने २६ तारखेला रास्तारोको आंदोलन आयोजित केले असून रस्त्यांच्या बिकट अवस्थेसाठी आता अनेक पक्ष व संघटना आक्रमक झाल्या आहेत.