Navratri 2023 : टेकडीवर हिरव्यागार वनराईत वसलेली दुर्गादेवी | पुढारी

Navratri 2023 : टेकडीवर हिरव्यागार वनराईत वसलेली दुर्गादेवी

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एक हरित परिसर म्हणजे निगडीतील दुर्गादेवी टेकडी. पिंपरी चिंचवडमधील एक शक्तीपीठ. ही टेकडी प्रसिध्द आहे ती दुर्गादेवीमुळे. काय आहे या दुर्गादेवीची कथा जाणून घेऊया-

चारही बाजूंनी असलेला हिरवागार परिसर…अल्हाददायी वातावरण… निसर्गसौंदर्याने नटलेल्या या परिसरातील गुफेत असलेली टेकडीवर वसलेली निगडीतील दुर्गा देवी. दुर्गा देवीच्याच नावाने ही टेकडी प्रसिध्द झाली आहे. दुर्गा देवी टेकडी एक पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यटन केंद्रच बनले आहे. दुर्गा देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. यापूर्वी या भागात खाणकपारी होती. तेथील देवीची मूर्ती पाहून विनोद शर्मा या भाविकाने देवीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधले. त्यानंतर जेव्हा पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापित झाली तेव्हा त्यावेळी हे मंदिर महापालिकेच्या अखत्यारित आले. तेव्हा भाविक शर्मा यांनी बांधलेल्या या मंदिराची डागडूजी केली. तसेच बाहेरील बाजूने मंदिर आणखी वाढवले. 11 ऑक्टोबर 1982 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. मंदिर परिसर पालिकेच्या अखत्यारित आला. महापालिकेने या टेकडीकडे विशेष लक्ष दिले. 2002 साली मंदिराची पुन्हा डागडूजी करुन मंदिर पुन्हा नव्याने स्थापित करण्यात आले आहे.

जेव्हा पिंपरी-चिंचवड ही नगरपालिका होती त्यावेळी 1976 रोजू दिनेश अब्दुलकर नावाचे कलेक्टर नियुक्त होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या परिसरात वृक्षारोपण मोहिम हाती घेतली. येथील संपूर्ण परिसर हरित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर 1982 मध्ये जेव्हा महापालिका स्थापन झाली होती. त्यावेळी नेमलेले प्रशासक हरनामसिंग यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा अभ्यास केला. त्यानुसार नाशिक फाटा ते एमआयडीसी या परिसरात वृक्षारोपण मोहिम राबवली. त्याचवेळी दुर्गादेवीटेकडीकडे विशेष लक्ष दिले गेले. तेथील परिसर पाहता तेथे काही औषधी आणि काही इतर झाडे लावण्यात आली. त्यामुळे मंदिराचा परिसर हरित झाला आहे. अशी माहितीदुर्गा देवी उद्यानाचे मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे यांनी दिली.

सन 2002 साली या मंदिराचे ट्र्स्ट प्रस्थापित करण्यात आले. नवरात्रीत मंदिरात अनेक कार्यक्रम घेतले जातात. नऊ दिवस देवीचा गोंधळ, आरती, भजन, पोवाडे अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दुर्गादेवी टेकडी हे भाविकांचे श्रध्दास्थान तर आहेच. त्याचबरोबर हे एक पर्यटन स्थळ असल्याने नागरिक नवरात्रात तर येतातच पण इतरही दिवशी भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी या परिसरात असते.

Back to top button