पालघर : मैत्रिणीने केला मैत्रिणीचा घात, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार | पुढारी

पालघर : मैत्रिणीने केला मैत्रिणीचा घात, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा :  विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मैत्रिणीने मैत्रिणीचा घात केला आणि 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच 3 मित्रांनी सामूहिक अत्याचार केला. विरार पोलिसांनी पीडित मैत्रिणीसह 3 जणांना अटक केली असून, एक आरोपी फरार झाला आहे.

पीडित मुलगी विरारमध्ये राहते. मंगळवारी संध्याकाळी ती मोबाईल दुरुस्तीसाठी बाहेर पडली असता मैत्रीण राणी भेटली. आपण
फिरायला जाऊ, असे सांगून तिने तिला विरार पूर्वेच्या साईदत्त नगर येथील निर्जन ठिकाणी नेले. तिथे या मैत्रिणीचे तीन मित्र हजर होते. त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. हे सारे घडत असताना ही मैत्रीण हजर होती. रात्री दीडपर्यंत हा प्रकार चालला. त्यांनी या मुलीला पहाटे 5 वाजता घरी आणून सोडले.

मुलीच्या आईला हा प्रकार समजताच बुधवारी संध्याकाळी विरार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी विशेष पथके तयार करून 6 तासांत पीडित मुलीची मैत्रीण राणी तसेच लाला, शुभम सिंग, आणि प्रतीक सिंग या चौघांना अटक केली.
त्यांच्यावर पोक्सो तसेच बलात्कार आणि अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी सज्ञान असून वीस ते बावीस वर्ष वयोगटातील आहे. एक आरोपी भाजी विक्रेता असून एक महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. लाला नावाच्या आरोपीवर अमलीपदार्थाचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

Back to top button