

पालघर (ठाणे): पालघर जिल्ह्याच्या दुर्गम-अतीदुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांमधील हजारो आदिवासी विद्यार्थी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याच्या संकटात सापडले आहेत. इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने अर्ज भरणे शक्य न झाल्यामुळे अनेकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जावे लागण्याची भीती पालकांमध्ये व्यक्त होत आहे. चौथ्या फेरी अखेर कॅप राउंड मधील 17 हजार 946 तर कोटा अंतर्गत प्रवेश 4 हजार 422 मिळून 22 हजार 368 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.53 टक्के विद्यार्थी प्रवेशा पासून वंचित आहेत.
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम-अती दुर्गम भागातील वाड्या-वस्ती आणि खेड्यापाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षणासाठी शहरी भागात जाणे त्यांना शक्य होत नाही.तसेच इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसल्याने दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज करताना अडचणीचा सामना करावा लागला.ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज न करता आल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी पालघर जिल्ह्यातून इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 48 हजार 401 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या फेरी अखेर 22 हजार 368 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.26 हजार 33 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाहीत.
पालघर जिल्हा आदिवासी उपयोजन (पेसा) क्षेत्रात असताना मोठया संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पाचवी फेरी आरक्षण विरहित राबवली जाणार आहे.पाचव्या फेरीच्या वेळा पत्रकाची घोषणा शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेशा बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकरावी प्रवेशाच्या चौथ्या फेरी अखेर पालघर जिल्हा आदिवासी उपयोजन क्षेत्रात असताना सत्तर हजारापेक्षा अधिकच्या संखेने विद्यार्थी अकरावी प्रवेशा पासून वंचित राहणार असल्यामुळे पालघर जिल्ह्यासाठी प्रवेश प्रक्रिया ऑफ लाइन पद्धतीने राबवण्याची मागणी केली जात आहे.
पालघर जिल्यातील आदिवासी विदयार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शहरी भागात शिक्षण घेऊ शकत नाहीत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या तालुक्यातील शाळा,कॉलेजमध्ये प्रवेश दिले गेले पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निदर्शनास ही अत्यंत गंभीर बाब लक्षात आणून देऊन येथील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळा कॉलेज मध्ये ऑफलाईन प्रवेश देण्याचे नियोजन केले पहिले.- योगेश नंदन, प्राध्यापक, संस्थापक अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक संघटना.
48 हजार 401 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
प्रवेश 17 हजार 946
कोटा प्रवेश 4 हजार 422
एकूण प्रवेश 22 हजार 368
टक्केवारी 46.21%