

मुंबईः महामुंबई नंतर पुणे- पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रात सुरु करण्यात आलेली अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता राज्यातील सर्वच महाविद्यालयात राबवली जाणार आहे.
राज्यातील तब्बल ११ हजारहून अधिक असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रवेशाची नियंत्रण जबाबदारी शिक्षण आयुक्तांकडे देण्यात आली आहे. गेल्या २००९ पासून मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआरडीए) क्षेत्रात अकरावीचे प्रवेश ऑनलाईन केले जातात. त्यानंतर २०१५ पासून पुणे पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक या महानगरपालिका क्षेत्रात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली. आता राज्यातील सर्वच जिल्ह्यात ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती उद्दिष्टांमध्ये समाविष्ट असलेल्या 'इज ऑफ लिव्हिंग' उद्दिष्टानुसार विद्यार्थी, पालकांचा वेळ, पैसा आणि श्रम याचा अपव्यय टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धती राज्यभर राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक स्तरावरून करण्यात केले जाणार आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सर्व महाविद्यालयांची जबाबदारी असणार आहे.
प्रवेश प्रक्रियेत नियमित चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू करावे. त्यानंतर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर सर्वांसाठी खुले प्रवेश ठेवावेत. हे प्रवेश गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहेत. या बाबतचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना द्यावेत. अकरावीत प्रवेशित होणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होईल, असे नमूद करण्यात आले आहे.