

मुंबई : मुंबईसह राज्यभर अकरावी ऑनलाईन प्रवेशांसाठी असलेले संकेतस्थळ सोमवारपासून खुले करण्यात येणार आहे. पहिले दोन दिवस सरावासाठी असणार आहेत. त्यानंतर 21 मे पासून प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
अकरावीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांला ऑनलाईन अर्ज दाखल करणे अनिवार्य असणार आहे. अर्ज करताना प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दाखले आणि कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदाची प्रवेशप्रक्रिया सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रवेशप्रक्रियेत 10 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना दोन दिवस अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. त्यानुसार 19 आणि 20 मे रोजी विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरणे, प्राधान्यक्रम नोंदवण्याचा सराव करता येणार आहे. त्यानंतर 21 मे रोजी नव्याने अर्ज भरावा लागणार आहे. प्रवेशाची पहिली फेरी 21 मेपासून सुरू होणार आहे. त्यात 21 ते 29 मे कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांचे किमान एक ते कमाल दहा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना शंभर रुपये शुल्क भरावे लागणार आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी 30 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. या यादीवर 1 जूनपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन 6 ते 12 जून या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.
अकरावीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज दोन भागात विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरावयाची आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेच्या मदतीने तसेच पालकांच्या मदतीने आपल्या अकरावी प्रवेशाचा वैयक्तिक माहितीचा पहिला भाग संकेतस्थळावर ऑनलाईन भरून घ्यावा. दुसरा भाग (पसंतीक्रम) हा विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरावा लागणार आहे. नामवंत असो...वा कमी कटऑफ असणारे महाविद्यालय त्या महाविद्यालयांच्या मागील वर्षीच्या कट ऑफ गुणांसह प्राधान्यक्रमांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे महत्वाचे असणार आहे.
कमी गुण मिळालेला विद्यार्थीही नामवंत महाविद्यालयांची आशा बाळगतो. त्यामुळे ऑनलाईन प्रवेशात त्याचा प्रवेश तीन फेर्यांनतरही प्रलंबित राहतो. विद्यार्थ्यांनी गतवर्षीचे महाविद्यालयांचे कटऑफ आणि आपले गुण पाहूनच अर्ज भरताना महाविद्यालय प्रवेशासाठी निवडावे लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्याने आपले नाव व दहावीच्या परीक्षेचा क्रमांक टाकल्यानंतर त्याची बहुतांश माहिती ही संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याचे विषयनिहाय गुण आपोआप अपडेट होतील. यावेळी विद्यार्थ्यांनी ही माहिती खातरजमा करून घ्यायची आहे.
माहिती बरोबर असल्यास उर्वरित माहिती भरावी. प्रवेशाच्या प्रक्रियेच्या दुसर्या टप्प्यामध्ये महाविद्यालयाचे संकेतांक क्रमांक विचारात घ्यावेत, महाविद्यालयातील शाखा, प्रकार, आरक्षणाचा गट, माध्यम, उपलब्ध असणारे वैकल्पिक विषय यांचा योग्य तो विचार करावा. अनुदानित आणि विनाअनुदानित तुकड्यांचे सांकेतिक क्रमांक दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी याकडेही लक्ष द्यावे. महाविद्यालयांचे सांकेतिक स्वतंत्रपणे नोंदवून मगच महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रम यादी तयार करावी. महाविद्यालयांची यादी तयार करताना दहावीला आपल्याला मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि निवडत असलेल्या महाविद्यालयांचे गेल्या वर्षीचे कट ऑफ यांचा योग्य तो ताळमेळ साधावा. गेल्या वर्षीचे कट्ऑफ हे केवळ मार्गदर्शक म्हणून विचारात घ्यायचे आहेत. याचीही नोंद घ्यावी. (यंदा वाढतील किंवा कमी पण होवू शकतात) प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर त्याची एक छापील प्रत विद्यार्थ्याने स्वतःकडे काढून ठेवावी.
प्रवेशाची पहिली फेरी : 21 मेपासून
अर्ज भरणे : 21 ते 29 मे
पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्ता यादी :30 मे
अंतिम गुणवत्ता यादी : 6 ते 12 जून
विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. जास्तीत जास्त 10 पसंतीक्रम नोंदवावे लागणार आहे.
हेल्पलाइन क्रमांक: 8530955564
ई-मेल : supportmahafyjcadmissions.in
हे आहे अधिकृत संकेतस्थळ - https://mahafyjcadmissions.in
यंदा राज्यात सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार आहेत. सर्व महाविद्यालयांनी ही माहिती गांभीर्याने नोंदवून, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
डॉ. महेश पालकर, अध्यक्ष, राज्यस्तरीय अकरावी प्रवेश नियंत्रण समिती
पहिल्या फेरीसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना अंतर्गत, व्यवस्थापन, अल्पसंख्यांक कोट्यातील राखीव जागांसाठीही अर्ज करता येणार आहे. या राखीव जागांवरील प्रवेश 3 जूनपासून देता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.