नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.२१) विविध पदांसाठी घेण्यात आलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा जिल्ह्यात शांततेत पार पडली. दोन सत्रांतील परीक्षेसाठी जवळपास ३ हजार ५०० उमेदवार गैरहजर होते.
एमपीएससीकडून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विक्रीकर निरीक्षक अशा निरनिराळ्या पदांसाठी शनिवारी पूर्व परीक्षा घेण्यात आली. नाशिकमधील १२ हजार ३८३ उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले. त्यानुसार शहरातील ३२ केंद्रांवर सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत पेपर घेण्यात आले. पहिल्या सत्रात ८ हजार ८८१ उमेदवारांनी परीक्षा दिली. यावेळी ३,५०१ उमेदवारांनी दांडी मारली. दुपारच्या सत्रात झालेल्या पेपरसाठी ८ हजार ८१३ उमेदवार उपस्थित होते. तर गैरहजर उमेदवारांची संख्या ३ हजार ५६९ इतकी होती. दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ हजार १४० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच परीक्षेवेळी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.