वाळकी, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असणार्या जलजीवन मिशन योजनेचा नगर तालुक्यात अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे सावळा गोंधळ चालू आहे. जनतेला जाणूनबुजून वेठीस धरण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.
कोकाटे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने जलजीवन मिशन योजनेची देशभरात यशस्वी अंमलबजावणी केली. यासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु याच योजनेचा नगर तालुक्यामध्ये पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी खेळखंडोबा चालवला आहे. योजनेची कार्यवाही करताना ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सुख सुविधा सोडून अधिकारी ठेकेदारांच्या सोयीनुसार कार्यवाही करीत आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये निविदा प्रक्रिया पार पाडणे प्रत्येक विभागास बंधनकारक आहे. परंतु नगर तालुक्यामध्ये अधिकार्यांच्या मेहेरबानीमुळे ठेकेदारांना आठवण येईल. तेव्हा त्यांच्या वेळेनुसार कागदपत्रे सादर करीत आहे. यामुळे तालुक्यात अद्यापपर्यंत एकाही कामास प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. अशाप्रकारे तालुक्यातील ग्रामस्थांना पूर्णपणे वेठीस धरण्याचे काम पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करीत असल्याचा आरोप यावेळी कोकाटे यांनी केले.