

नाशिक (देवळाली कॅम्प) : लहवित येथे बुधवारी मध्यरात्री मांजरीची शिकार करण्यासाठी बिबट्याने झेप घेतली. मात्र, सिमेंटचा पत्रा तुटून बिबट्या थेट घरात पडल्याची घटना घडली. यावेळी अंधाराचा फायदा घेत बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. लहवित येथील शुभम बाळू गायकवाड यांचे कुटुंब घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने मांजरीच्या शिकारीसाठी पाठलाग केला. यावेळी मांजर जीव वाचविण्यासाठी गायकवाड यांच्या घरावर चढली होती. तिच्यापाठोपाठ बिबट्यानेही झेप घेतल्याने त्याच्या वजनाने सिमेंटचे पत्रे तुटून बिबट्या घरात पडला.
यावेळी गायकवाड कुटुंबीय खडबडून जागे झाले. मात्र, बिबट्याने घराच्या मागील खिडकीतून बाहेर झेप घेत जंगलात धूम ठोकली. याबाबत वनविभागाला माहिती कळताच कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात कर्मचार्यांनी पहाटेपर्यंत शोध घेतला. परंतु बिबट्या आढळून आला नाही.