नांदगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही. फक्त नांदगाव मतदारसंघातील भरीव कामे पूर्णत्वाला नेणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील झालेेले आणि 15 दिवसांपासून मतदारसंघाबाहेर असलेले आमदार कांदे मतदारसंघात परतले. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
आम्ही शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी मागील काळात भरपूर कामे केली आहेत. आम्ही शिवसेनेतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनमाड-करंजवण योजना, नांदगाव-गिरणा धरण योजना, 78 खेडी योजना आदींसह मतदारसंघातील विकासकामांना आपण प्राधान्य देणार आहे. सरकारकडून कामे करून घेऊ, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीला ब्रेक देण्यात आला असून, तो निधीदेखील लवकरच वाटप केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सूरत, गुवाहटी, गोवा येथील मुक्कामाबाबतही त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या प्रसंगी बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, आनंद कासलीवाल, सुभाष कुटे, राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, विलास आहेर, गुलाब भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, सरपंच अश्विनी पवार, नूतन कासलीवाल, उपस्थित होते.