नाशिक मनपा निवडणूक : अंतिम मतदारयादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध

नाशिक मनपा निवडणूक : अंतिम मतदारयादी ‘या’ दिवशी होणार प्रसिद्ध

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाने 44 प्रभागांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयाद्यांवर दाखल झालेल्या विक्रमी 3 हजार 847 हरकतींवर 44 पथकांनी चौकशी पूर्ण करून आपला अहवाल विभागीय अधिकार्‍यांकडे सादर केला आहे. सहा विभागीय अधिकार्‍यांनी बुधवारी (दि.13) चौकशी अहवाल उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. पुढील दोन दिवस हरकतींची आणि मतदारयादीचा ताळमेळ तपासत शनिवारी (दि.16) प्रभागांसाठी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असल्याचे घोडे-पाटील यांनी स्पष्ट केले.

सिडकोत प्रारूप मतदारयाद्यांवर सर्वाधिक 2,433 तर नाशिक पश्चिममधून सर्वांत कमी 46 हरकती प्राप्त झाल्या होत्या. या हरकतींच्या पडताळणीची जबाबदारी आयुक्त रमेश पवार यांनी विभागीय अधिकारी, नोडल अधिकारी, पर्यवेक्षक, यादीप्रमुख, यादी सहाय्यक आदी सुमारे 300 अधिकारी-कर्मचार्‍यांना दिली होती. त्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक याप्रमाणे 44 पथके स्थापन केली होती. पथकांकडून हरकतींची छाननी, प्रत्यक्ष स्थळपाहणी, पंचनाम्याची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण होऊन अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधित पथकाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रात फिरून मतदारयादीमधील हरकतीची चौकशी करून दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली. या चौकशीनंतर पथकांनी विभागीय अधिकार्‍यांकडे तर त्यांनी निवडणूक शाखेत चौकशी अहवाल जमा केले आहेत.

हरकतींच्या अहवालानंतर मतदारांच्या नावांचा आक्षेप आणि प्रभागातील मतदारांच्या संख्येची पडताळणी केली जाणार आहे. हे काम पुढील दोन दिवस सुरू राहणार आहे. येत्या शनिवारी (16) प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.

– मनोज घोडे-पाटील, उपआयुक्त निवडणूक विभाग, मनपा

विभागनिहाय हरकती
सिडको 2,433
पंचवटी 396
पूर्व 244
नाशिकरोड 222
सातपूर 155
पश्चिम 46
ट्रू व्होटर्स अ‍ॅप 352
एकूण 3,847

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news