दोरीवरच्या उड्या मारा; तंदुरुस्त राहा! | पुढारी

दोरीवरच्या उड्या मारा; तंदुरुस्त राहा!

बालपणी दोरउड्या, दोरी ओढण्याची चढाओढ हे खेळ तुम्ही कधी ना कधी खेळले असतीलच; पण मोठे झाल्यानंतर हे खेळ तुम्ही विसरूनही गेला असाल. आता ते परत आठवा. कारण या खेळाची आजही तुम्हाला गरज आहे.

आरोग्य राखण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दोरीवरच्या उड्या हा उत्तम व्यायाम आहे. उंची वाढवायची असेल, शरीराला वळणदार बनवायचे असेल, वजन कमी करायचे असेल तर दोरीवरच्या उड्या अतिशय चांगला व्यायाम आहे. घरातील बुजूर्ग मंडळींनी दोरउड्या खेळण्याचा सल्ला दिला असेल, तर तो तातडीने अमलात आणा. अजूनही वेळ गेलेली नाही.

दोरी घ्या आणि चला आपल्या छतावर किंवा घराजवळील बगीच्यात आणि हो, जाण्याआधी दोरी उड्यांचे नियम आणि फायदे जाणून घ्या.

नियम :

* दोरीवरच्या उड्या खेळताना आधी हळू-हळू उड्या मारा. दुसर्‍या मिनिटापर्यंत तुमचे शरीर गरम होईल. मग तुम्ही जोराने उड्या मारू शकता. वॉर्मअप केल्याशिवाय उड्या मारल्याने शरीरात वेदना होऊ शकतात.
* दोरीवरच्या उड्या मारल्यानंतर पाच मिनिटे आराम करा किंवा शवासनात पडून राहा.
* अर्ध्या तासानंतर हलका आहार घ्या. उदा. मोड आलेले कडधान्य, सफरचंद, केळी, दूध, लिंबू पाणी यांचा समावेश असू द्या.
* या उड्यांसाठी नायलॉनची दोरी वापरा.

फायदे :

* लवकर लवकर श्वास घेण्याने फुफ्फूस तंदुरुस्त राहते.
* पायाचे सांधे बळकट बनतात.
* दोरीच्या उड्यांनी पोट आत-बाहेर होते. यामुळे पोटावरची साचलेली चरबी कमी होते.
* बोटांची काम करण्याची क्षमता वाढते, लेखक आणि कलाकारांसाठी हा एक चांगला व्यायाम आहे.
* शरीरिक संतुलन वाढते.

हे लक्षात ठेवा :

* उच्च रक्तदाबाचा आजार असलेल्यांनी हा व्यायाम करू नये.
* सिझेरियननंतर तीन महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्यायाम करा.
* हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी हा व्यायाम करू नये. थोडक्यात, वैद्यकीय सल्ल्याशिवाय अचानकपणाने उठून दोरीउड्या मारू नका इतकेच!

डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button