नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शाळेत जाते असे सांगून, आश्रमातून बाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली नऊवर्षीय विद्यार्थिनी सतर्क नागरिकांच्या मदतीने सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात शोधत तिला आश्रमशाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात दिले.
आश्रमातील नऊवर्षीय विद्यार्थिनी शनिवारी (दि. 6) सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतरही ती परतली नाही. आश्रमशाळा व्यवस्थापनाने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून एक पथक तयार केले. गोपनीय माहितीनुसार तसेच मोबाइलद्वारे माहिती देऊन विद्यार्थिनीचा शोध सुरू असताना, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे यांना मुलीची माहिती मिळाली.
त्यांनी तत्काळ गंगाघाटावरील दहीपूल गाठून मुलीला ताब्यात घेतले. या ठिकाणी सतर्क नागरिक विकास शिंदे व सतीश तुपे यांच्या सहकार्याने मुलगी सुखरूप सापडली. सरकारवाडा पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने नऊवर्षीय बालिकेस आश्रमाच्या पदाधिकार्यांकडे सोपवले. पोलिस शिपाई नाझिम शेख, पोलिस नाईक महाले यांनी हा तपास केला.