पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: शहरामध्ये 18 ते 59 वयोगटांतील सर्वाधिक 82 हजार 675 नागरिकांनी कोरोनाचा बूस्टर घेतला आहे. मोफत डोस उपलब्ध करून दिल्यामुळे गेल्या 25 दिवसांत मिळालेला हा भरघोस प्रतिसाद आहे. त्या खालोखाल 62 हजार 320 ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक, हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर यांना मोफत बूस्टर डोस दिला जात होता.
मात्र, केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना देखील महापालिकेच्या 8 केंद्रांवर बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. गेल्या 25 दिवसांत 82 हजार 675 नागरिकांनी बूस्टर डोस घेऊन कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली आहे. आत्तापर्यंत 62 हजार 320 ज्येष्ठ नागरिकांनी तर, 23 हजार 682 हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर यांनी बूस्टर डोस घेतला आहे.