

मनमाड : (जि. नाशिक) मेक्सिको लिओन येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षा व्यवहारे हिने ऐतिहासिक कामगिरी करत भारतासाठी सिल्व्हर मेडल मिळविले आहे. तिने या स्पर्धेत 40 किलो वजनी गटात 59 किलो स्नॅच व 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.
याबाबत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर, प्रवीण व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मेक्सिकोच्या लिओन येथे जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनेक देशांतील खेळाडूंनी भाग घेतला आहे. भारतातून गेलेल्या खेळाडूंमध्ये मनमाड येथील आकांक्षा व्यवहारे हिचा समावेश होता. आकांक्षा हिने 59 किलो स्नॅच व 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून भारतासाठी सिल्व्हर मेडल पटकावले आहे. तिने केलेल्या कामगिरीबद्दल आमदार सुहास कांदे, संतोष सिंहासने, संजय मिसर, प्रमोद चोळकर, मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी आदींनी अभिनंदन केले आहे.