

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जेमतेम परिस्थितीत डोक्यावर कर्ज आणि मुलीच्या लग्नाची जबाबदारी यामुळे कायम तणावात असणार्या व सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्या खेडी येथील हिरालाल निंबा पाटील यांनी राहत्या घरातील शौचालयात गळफास घेवून आत्महत्या केली.
हिरालाल पाटील (वय ४८, रा. खेडी, जळगाव) हे कालिंकामाता मंदिर परिसरात एका ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी हिरालाल पाटील हे शौचालयास गेले. बराच वेळ उलटूनही आले नसल्याने त्यांच्या पत्नीला शंका आली. पत्नी पहावयास गेली असता, आतून दरवाजा बंद होता. तर, पती हिरालाल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. व हिरालाल पाटील यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अतूल पाटील यांनी पंचनामा केला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मृत हिरालाल पाटील यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. कर्ज त्यातच हलाखीची परिस्थिती असल्याने मुलीचे लग्न कसे करणार या ताणतणावात गेल्या काही दिवसांपासून हिरालाल पाटील होते.
यातूनच हिरालाल पाटील यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती मृत हिरालाल पाटील यांचे भाऊ मनोहर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
तसेच हलाखीची परिस्थिती असल्याने मदत मिळावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी डॉ. प्राची सुरतवाला यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.