सीईटी परीक्षा : 8 लाख विद्यार्थी परीक्षांच्या वेटिंगवर! | पुढारी

सीईटी परीक्षा : 8 लाख विद्यार्थी परीक्षांच्या वेटिंगवर!

मुंबई ; पवन होन्याळकर : 15 सीईटींना राज्यभरातून तब्बल आठ लाख विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा नोंदणी अर्ज सीईटी सेलने भरुन घेतले आहेत. मात्र, परीक्षांच्या तारखाच जाहीर केलेल्या नाहीत. परीक्षा घेणार्‍या कंपनी बदलण्याचे सत्र सीईटी सेलच्या वतीने सुरू असून दुसरीकडे सीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी मात्र वार्‍यावर असल्याचे चित्र राज्यात आहेत.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी याबरोबरच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेंन्ट, आर्कीटेक्चर, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात असलेल्या विविध संस्थातील सुमारे चार लाख जागांवरील प्रवेश हे प्रवेश पूर्व परीक्षांच्या गुणावरच दिले जातात.

यंदा या परीक्षा कधी होणार याबाबत स्पष्टता विद्यार्थ्यांना दिलेली नाही. विद्यार्थ्यांची अर्ज नोंदणी पूर्ण केली आहे, मात्र परीक्षा कधी होणार हेच सांगितलेले नाही. 15 विविध सीईटीसाठी तब्बल 7 लाख 74 हजार 859 राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याची फी भरली आहे. हे विद्यार्थी परीक्षांच्या तारखांच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या काही वर्षापासून सीईटी सेलमध्ये परीक्षा घेणार्‍या कंपनी बदलण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, या बदलामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे करिअर सुरू होणार आहे, अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत दखल घेतली जात नसल्याचे दिसत आहे. कोरोना महामारीत वेळेत प्रवेश पूर्ण व्हावेत, असे वाटत नसल्याचे वातावरण सीईटी सेलमध्ये आहे.

या विद्यार्थ्यांच्या सीईटी वेळेत नाही झाल्या तर राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि डीएड, बीएड एमबीए आदी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक सत्रच कोलमडण्याची भीती आहे. या परीक्षानंतर निकाल जाहीर होण्यासाठी महिनाभराचा अवधी त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा भरणे मुश्किल होईल, असे संस्थाचालकांना वाटत आहे.

बारावीचा निकाल लागून अन्य अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटी सेलने आठवडाभरात परीक्षाबाबत परिपत्रक काढून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी पालक करीत आहेत.

Back to top button