धुळे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात आणि हरियाणा राज्यातील पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघा अट्टल घरफोडी करणाऱ्यांना धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 23 गुन्हे दाखल आहेत.
दोंडाईचा येथील चैतन्य कॉलनीत राहणारे राजेंद्र शामलाल गुप्ता यांच्याकडे घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी घरांचा कडी कोंडा आणि कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रक्कम चोरून नेल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी सह जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र वाढत असल्याने पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना गजाआड करण्यासाठीचे आदेश संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी सह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बुधवंत यांना देखील दिले होते. त्यामुळे बुधवंत यांनी समांतर तपास सुरू केला. यात हा गुन्हा नंदुरबार येथे राहणारा सराईत गुन्हेगार जिमी विपीन शर्मा याने त्याच्या साथीदारांचा केल्या असल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्याचप्रमाणे जीमी हा गुजरात राज्यातील सुरत येथे पसार झाल्याची माहिती मिळाल्याने बुधवंत यांनी पथकास सुरत येथे रवाना केले. मात्र दोघेही चोरटे त्यांना आढळून आले नाही. याच दरम्यान सुरत येथील विमानतळावरून जिमी हा दिल्ली येथे पळून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तातडीने हालचाली करून सुरत येथील विमानतळावरून जिमी शर्मा याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने नंदुरबार येथीलच शाहरुख रफिक शहा यांच्या मदतीने दोंडाईचा येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे शाहरुख रफिक शहा याला देखील पथकाने ताब्यात घेऊन या दोघांकडून गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल तसेच ते वीस हजाराच्या रोकड सह 1, 14, 000 रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस पथकाने तपास केला असता या दोघांनी महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात आणि हरयाणा राज्यात देखील अशाच प्रकारच्या घरफोड्या करून विमानाने पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांविरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 23 गुन्ह्यांची नोंद आढळून आले असून या चारही राज्यांमध्ये त्यांनी आणखी मोठे गुन्हे केल्याची शक्यता पोलिस पथकाने व्यक्त केली आहे.